देशात सर्वाधिक कर भरणाऱ्या करदात्यांच्या यादीवर यंदाही बॉलीवूड कलाकार, शेअर ट्रेडर्स आणि प्रतिष्ठित वकिलांचे वर्चस्व पहायला मिळाले. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राच्या हाती लागलेल्या माहितीनुसार अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खान हे दोघेजण बॉलीवूडमधील सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यक्तींच्या यादीत आघाडीवर आहेत. सलमान खानने येत्या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर म्हणून २० कोटी इतकी रक्कम भरली आहे, तर त्यापाठोपाठ अक्षय कुमारने १६ कोटींचा कर भरला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांनी अनुक्रमे ६०० कोटी आणि २०० कोटींचा व्यवसाय केला होता. दरम्यान, या दोघांच्यापाठोपाठ रणबीर कपूरने १५ कोटी आणि शाहरूख खान १४ कोटी आणि अमिताभ बच्चन यांनी ८.७५ कोटींचा कर भरला आहे. याशिवाय, मुंबईतून सर्वाधिक कर भरण्याचा मान गर्भनिरोधक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या फॅमी केअर लिमिटेडच्या टापरिया कुटुंबियातील चौघांनी मिळवला आहे. टापरिया कुटुंबियांनी भरलेल्या आगाऊ कराची एकत्रित रक्कम २११ कोटी इतकी आहे. यामध्ये फॅमी केअरचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आशुतोष टापरिया यांनी ७५ कोटी, व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार टापरिया यांनी ६३ कोटी, अरूणा देवी टापरिया यांनी ३७ कोटी आणि अंजली आशुतोष टापरिया यांनी ३६ कोटी रूपये आगाऊ करापोटी भरली आहेत.
आयकर खात्याच्या नियमावलीनुसार नॉन-कॉर्पोरेट प्रकारात मोडणाऱ्या करदात्यांनी त्यांच्या उत्त्पन्नानुसार पहिल्या दोन तिमाहींमध्ये प्रत्येकी ३० टक्के आणि उर्वरित तिमाहींमध्ये ४० टक्के कराची रक्कम भरणे आवश्यक असते.