कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचाराचे मोठे केंद्र समजले जाणाऱ्या मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरिअल रुग्णालयाने नवी मुंबईतील खारघरपाठोपाठ आता ठाण्यातही रुग्णालय सुरु करावे, अशास्वरुपाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने रुग्णालय व्यवस्थापनाकडे पाठविला असून त्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची तयारीही दाखविली आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील कॅन्सरग्रस्त रुग्णांचा आकडा लक्षात घेता ठाणे शहरात अशाप्रकारच्या रुग्णालयाची आवश्यकता आहे. खारघर येथे टाटा मेमोरिअल स्ट्रस्टचे कॅन्सरवरील संशोधन केंद्र अस्तित्वात असून तेथे अजूनही हव्या त्या प्रमाणात रुग्णांवर उपचार केले जात नाहीत. या पाश्र्वभूमीवर ठाणे शहरात उपचार केंद्र सुरु करावे, असा महापालिकेचा प्रस्ताव आहे. टाटा मेमोरिअल ट्रस्टने ठाण्यात रुग्णालय सुरु करण्यासंबंधी याआधी इच्छा प्रदर्शित केली होती. त्यास महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.  पालिकेच्या निमंत्रणानुसार टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे पदाधिकारी मंगळवारी २२ जुलै रोजी ठाण्यात येऊन आयुक्त गुप्ता यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यावेळी महापालिकेच्या वतीने या उपक्रमासाठी उपलब्ध भुखंड दाखविण्यात येईल, अशी माहिती पालिकेतील सुत्रांनी दिली. ठाणे शहरात कॅन्सरग्रस्तांना उपचार उपलब्ध करून देता यावे या उद्देशाने परळ येथील टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पालिका आयुक्त आसीम गुप्ता यांना ८ जुलै रोजी पत्र पाठवून इच्छा व्यक्त केली होती. परळ येथील टाटा रुग्णालयाचा अपवाद वगळता ठाणे, तसेच नवी मुंबईत परिसरात सवलतीच्या दरात कॅन्सरवर उपचार करणारे एकही रुग्णालय नसल्याने या प्रस्तावावर लवकर कार्यवाही होईल, अशी आशा आहे.

नफा नाही, जनसेवा
या रुग्णालयाच्या माध्यमातून कोणताही नफा कमविण्याचा हेतू नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्राला आयुक्त गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या रुग्णालयासाठी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाभोवती असलेला सात एकर क्षेत्रफळाचा भूखंड दाखविला जाणार आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या घरासाठी भूखंडही उपलब्ध करु देण्याची पालिकेची तयारीही आहे.