मुंबईत टाटा पॉवर कंपनी विद्युत यंत्रणा उभारून वीजपुरवठा करू शकते, असा स्पष्ट निर्वाळा देत ‘टाटा’ला आपल्या हद्दीत वीजवितरण करता येणार नाही, हा ‘बेस्ट’चा दावा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. त्यामुळे वीजबिलांच्या फुगलेल्या आकडय़ांनी हैराण झालेल्या सामान्य मुंबईकरांना स्वस्त विजेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ‘बेस्ट’च्या तुलनेत घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट ७० पैसे ते अडीच रुपयांपर्यंत स्वस्त असलेली ‘टाटां’ची वीजच ‘बेस्ट’ ठरणार असून बरेच वीजग्राहक बेस्टला टाटा करण्याची चिन्हे आहेत.
‘टाटा पॉवर कंपनी’ला मुंबईत सर्वत्र किरकोळ वीजपुरवठा करण्याचा परवाना असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये दिला होता. त्यानंतर ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या ग्राहकांप्रमाणेच शहरातील ‘बेस्ट’च्या ग्राहकांनाही ‘टाटा पॉवर’ची वीज मिळावी, अशी मागणी झाली. मात्र ‘बेस्ट’ची वीजयंत्रणा न वापरता स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल अशी अट टाकत वीज आयोगाने त्यास परवानगीही दिली.
मात्र आपल्या हद्दीत दुसऱ्या वीजवितरण कंपनीस वीजपुरवठा करता येणार नाही, असा आक्षेप ‘बेस्ट’ने घेतला आणि त्याविरोधात केंद्रीय विद्युत अपिलीय लवादात धाव घेतली. लवादाने ‘बेस्ट’चा आक्षेप धुडकावत ‘टाटा पॉवर’ला समांतर वीजपुरवठा करता येईल, असे स्पष्ट केले. त्यास ‘बेस्ट’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. सुरेंद्रसिंग निजार यांच्या खंडपीठाने गुरुवारी ‘बेस्ट’चा आक्षेप धुडकावून लावत मुंबई शहरात आपली वीजयंत्रणा टाकून वीजपुरवठा करण्यास ‘टाटा पॉवर’ला हिरवा कंदील दाखवला.
अर्थकारणाला झटका
या निकालामुळे मुंबईतील वीज पुरवठय़ातील ‘बेस्ट’ची मक्तेदारी संपुष्टात आल्याने ‘बेस्ट’च्या अर्थकारणालाच जोरदार झटका बसण्याची भीती आहे. ‘बेस्ट’च्या वाहतूक विभागाला सुमारे ६०० ते ७०० कोटी रुपयांचा तोटा दरवर्षी होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी ‘बेस्ट’च्या वीजग्राहकांवर प्रति युनिट ५५ पैसे ते दोन रुपये इतका अतिरिक्त बोजा टाकण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा विभाग नफ्यात असूनही ‘बेस्ट’ची वीज महाग आहे. आता ‘टाटा पॉवर’ने आपले जाळे विस्तारल्यानंतर ‘बेस्ट’चे ग्राहक ‘टाटा’कडे जातील. परिणामी वीजग्राहकांकडून मिळणारी ही रक्कम कमी होईल.

बडे ग्राहक : मॉल्स, मल्टिप्लेक्स, हॉटेल व्यावसायिक, कार्यालयीन आस्थापने यांच्यासाठीही ‘टाटा’ची वीज प्रति युनिट सव्वा रुपये ते अडीच रुपये इतकी स्वस्त आहे. त्यामुळे हे बडे वीजग्राहक ‘बेस्ट’ला ‘टाटा’ करण्याची चिन्हे आहेत.

सध्या ‘टाटा’चे उपकेंद्र असलेल्या परिसरात नवीन ग्राहकांना वीजपुरवठा देण्यासाठी यंत्रणा उभारणे तुलनेत सोपे आहे. परिणामी, ‘बेस्ट भवन’च्या आसपासचा परिसर व पारसी कॉलनी, फिनिक्स मिल व त्याच्या आसपासचा बडय़ा मॉल, मल्टिप्लेक्स, व्यावसायिक आस्थापनांचा परिसर अशा भागात नवीन ग्राहक मिळवणे ‘टाटा’ला सोपे जाणार आहे.