‘टाटा पॉवर कंपनी’ने १ एप्रिल २०१५ पासून मुंबईतील ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या विजेच्या दरासाठीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. घरगुती ग्राहकांसाठी वीजदरात १३ पैसे ते ४३ पैसे प्रति युनिट अशी दरवाढ प्रस्तावित केली असली तरी वहन आकारात कपात सुचवल्याने ‘टाटा’च्या वीजग्राहकांना दरवाढीचा झटका बसणार नाही.
बहुवार्षिक वीजदर प्रणालीनुसार ‘टाटा पॉवर’ने वीजदर प्रस्ताव सादर केला आहे. १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी २.४९ पैसे प्रति युनिटऐवजी २.६२ पैसे असा दर प्रस्तावित करून १३ पैशांची वाढ मागण्यात आली आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठी ४३ पैसे, ३०१ ते ५०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठी २५ पैशांची तर ५०० युनिटपेक्षा जास्त वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी ३१ पैशांची दरवाढ मागण्यात आली आहे. पण त्याचवेळी वहन आकारात ३६ पैशांची कपात मागण्यात आल्याने प्रत्यक्षात प्रत्येक युनिटसाठी सध्यापेक्षा कमी दर ग्राहकांना लागू होईल. दरवाढीचा झटका बसणार नाही.
महावितरण, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या वीजदर प्रस्तावामुळे ग्राहकांना दरवाढीचा झटका बसणार आहे. तर नाममात्र वीज दरवाढ व त्याचवेळी वहन आकारात कपात सुचवल्याने ‘टाटा’च्या वीजग्राहकांना दरवाढीपासून मुक्तता मिळणार आहे.