सायरस यांचा ‘ई-मेल’ बॉम्ब; ‘कर्जबुडव्या अध्यक्ष’ ठरवून गच्छंती केल्याचा आरोप

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निष्कासित करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी अखेर बुधवारी प्रथमच हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांना लक्ष्य करत आरोपांची लडच लावली. समूहात कंपनी सुशासनाचा अभाव असून आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या समूहातील पाच कंपन्यांमुळे एक लाख ७४ हजार कोटी रुपयांचा भरुदड पडू शकतो, असा इशारा दिला. आपल्याला ‘कर्जबुडव्या’ अध्यक्ष म्हणूनच कमी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना सोमवारी सायंकाळी काढून टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी समूहाच्या संचालक मंडळाच्या अन्य सदस्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये थेट रतन टाटा आणि टाटा समूहावरच शाब्दिक हल्ला केला. ‘गोपनीय’ या शीर्षकासह लिहिलेले हे पत्रच बुधवारपासून समाजमाध्यमांतून फिरू लागले. हे पाच पानी पत्र टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांनाही पाठविण्यात आले असून त्यावर मिस्त्री यांनी कोणतेही पदनाम न टाकता केवळ आपले नाव लिहिले आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतरही मिस्त्री हे सध्या समूहातील एक संचालक म्हणून कायम आहेत. याच नात्याने ते बुधवारीही समूहाच्या ‘बॉम्बे हाऊस’ मुख्यालयात हजर झाले होते.

टाटा समूहातील टाटा मोटर्स, टाटा स्टील युरोप, टाटा पॉवर मुंद्रा, टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस व इंडियन हॉटेल्स या पाच कंपन्यांचा एक लाख ७४ हजार कोटी रुपये इतका भरुदड भार हा समूहाच्या निव्वळ मालमत्तेएवढा आहे, असे त्यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले. या पाचपैकी टाटा मोटर्सचा नॅनो प्रकल्प, टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसमधील टाटा डोकोमो व्यवसाय गुंडाळला अथवा विकला असता तर आजचे नुकसान टळले असते, असे मिस्त्री यांनी म्हटले आहे. समूहाच्या नागरी हवाई व्यवसाय व्यवहारातही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रतन टाटा यांनी भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयांनी मला प्रसंगी कठोर निर्णय घेण्यापासून वंचित ठेवले. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मी जे निर्णय घेतले त्यासाठी मला आव्हानांचा सामना करावा लागला. मी जे काही केले ते समूहाची प्रतिमा जपण्यासाठी आणि समूहाच्या भागधारकांमधील अस्वस्थता शमविण्यासाठीच. – सायरस मिस्त्री.