दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्चूनही राज्यातील विशेषत: ग्रामीण भागांतील शिक्षणाचा दर्जा सुमारच राहिला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘शाळा आमच्या- ज्ञान तुमचे’ या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण भागांतील सरकारी शाळा खाजगी उद्योग समूहांना दत्तक देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक महसूल विभागातील २५ शाळा टाटा उद्योग समूहाला दत्तक देण्यात येणार आहेत. उद्योगपती रतन टाटा यांनीही या प्रस्तावास अनुकूल प्रतिसाद दिला असून पुढील बैठकीत त्याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
*शाळांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि शिक्षकांचे वेतन तसेच विद्यार्थ्यांची पुस्तके, पोषण आहार आदीवर मोठय़ा प्रमाणात निधी खर्च होऊनही गुणवत्तेच्या अभावामुळे हा निधी एकप्रकारे वायाच जात आहे. त्यामुळे या भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने आता कंबर कसली आहे.
*त्यानुसार सरकारी शाळा खाजगी उद्योजकांना दत्तक देण्यात येणार आहेत.या शाळांना
लागणारा पगार व शैक्षणिक खर्च सरकारच उचलणार आहे.
*या शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण आणि शाळा व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी सबंधित उद्योग समूहाकडेच ठेवण्यात येणार आहे.
*या योजनेत आणखी सुधारणा करायच्या असतील तर त्या ही उद्योग समूह करू शकतात.
*राज्यातील चारपैकी दोन विद्या निकेतनही टाटा समूहाला दत्तक देण्यात येणार आहेत.
“हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य उद्योजकांनीही त्यासाठी काम करावे आणि शाळा दत्तक घ्याव्यात यासाठी आपण स्वत: पुढाकार घेणार आहोत.”
– रतन टाटा, उद्योजक.
“पुण्यात शाळा दत्तक देण्याचा प्रयोग करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटांच्या प्रतिसादामुळे अन्य उद्योजकही पुढे येतील, असा विश्वास आहे.”
अश्विनी भिडे, सचिव, शालेय शिक्षण विभाग.