घडय़ाळय़ाच्या काटय़ामागे धावत रोजचा गाडा ओढणाऱ्या देशाच्या आर्थिक राजधानीला दोन घटनांनी मंगळवारी दिवसभर रखडवले. टाटा पॉवर कंपनीचा ५०० मेगावॉट क्षमतेचा वीजसंच बंद पडल्यामुळे सकाळी पावणेदहापासून रात्री उशिरापर्यंत अवघ्या दक्षिण मुंबईसह उपनगरांतील बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. तर, घाटकोपर-विक्रोळी स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने दिवसभर लोकलसेवा विस्कळीत झाली.
 ‘टाटा पॉवर कंपनी’चा ट्रॉम्बे येथील ५०० मेगावॉटचा वीजनिर्मिती संच तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास बंद पडला. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांत विजेचा लपंडाव सुरू झाला. मुंबई आणि उपनगरांतील वीजग्राहक वर्षांला ५०० कोटी रुपये ‘स्टँडबाय आकारा’पोटी देत असल्याने महाराष्ट्रातील वीज राजधानीकडे वळवण्यात आली. परंतु, बाहेरून वीज आणणाऱ्या पारेषण वाहिन्यांच्या मर्यादेमुळे केवळ अडीचशे मेगावॉट वीजच उपलब्ध होऊ शकली. त्यामुळे प्रतीक्षा नगर, वडाळासारख्या अनेक भागात सकाळपासून सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नव्हता. तर बेस्ट आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरलाही आपापल्या भागात टप्प्याटप्प्याने एक तासांचे भारनियमन करावे लागले. हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सायंकाळनंतर अनेक भागांत वीजपुरवठा सुरू झाला असला तरी काही भाग रात्रीही अंधारात बुडाल्याचे चित्र होते. छोटय़ा व्यापारी आस्थापनांना या भारनियमनाचा फटका बसला. मात्र, शेअर बाजार, मोठी व्यावसायिक आस्थापने यांची पर्यायी व्यवस्था असल्याने तेथील व्यवहारांवर परिणाम झाला नाही.
या भागांना फटका
दादर, भायखळा, शिवडी, प्रतीक्षा नगर, वडाळा, माहीम, धारावी, प्रभादेवी, परळ, चिंचपोकळी, गिरगाव, मुंबई सेंट्रल, हुतात्मा चौक, नरिमन पॉइंट, सांताक्रूझ, चेंबूर, वांद्रे, साकीनाका.