राज्य सरकारने बरखास्त केलेल्या हकीम समितीने केलेली एका रुपयाच्या भाडेवाढीची शिफारस मुंबई टॅक्सीमेन्स युनियन या टॅक्सी संघटनेने धुडकावून लावली आहे. या भाडेवाढीला उच्च न्यायालयाची मान्यता मिळणे  बाकी आहे. मात्र त्याआधीच या संघटनेने वेगळीच भूमिका मांडत एक रुपयाऐवजी किमान भाडे दोन रुपये वाढवून मिळावे, अशी मागणी केली आहे. तसेच भाडेवाढीमुळे अत्यावश्यक असलेल्या मीटर रिकॅलिबरेशनलाही टॅक्सी संघटनेने विरोध केला आहे.मीटर रिकॅलिबरेशनच्या प्रक्रियेसाठी एक हजारांच्या आसपास खर्च येतो. त्याचप्रमाणे दलालांना ३००-४०० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे या मीटर रिकॅलिबरेशनला टॅक्सी संघटनेने विरोध दर्शवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ जूनपासूनही टॅक्सीचालक २१ रुपये एवढेच किमान भाडे घेणार आहेत, असे संघटनेचे सरचिटणीस एल. क्वाड्रोस यांनी स्पष्ट केले. टॅक्सीमालकांना हय़ुंदाई कंपनीची  आय-१० ही गाडी विकत घ्यावी लागते. या गाडीची किंमत ३.४५ लाख एवढी आहे. त्याशिवाय या गाडीच्या विम्याची रक्कमही जास्त आहे, त्यामुळे दोन रुपयांची वाढ हवी अशी भूमिका क्वाड्रोस यांनी मांडली.