रिक्षा-टॅक्सीच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी १५ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. मात्र कॅलिब्रेशनच्या अधिकृत मुदतवाढीचा प्रस्ताव परिवहन विभाग सोमवापर्यंत राज्य सरकारला सादर करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
डॉ. हकीम समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढीनंतर ४५ दिवसांमध्ये मीटर कॅलिब्रेशन करण्याची मुदत देण्यात आली होती. शनिवारी, २४ नोव्हेंबर रोजी ही मुदत संपुष्टात आली. मुंबईच्या तीन प्रादेशिक परिवहन विभागांमध्ये सुमारे २० हजार टॅक्सींचे, तर ४५ हजार रिक्षांचे कॅलिब्रेशनचे काम या काळात पूर्ण झाले. अद्याप २५ हजार टॅक्सी, तर तब्बल ६० हजार रिक्षांचे कॅलिब्रेशन झालेले नाही. परिवहन विभागाने २५ नोव्हेंबरपासून अशा टॅक्सी-रिक्षांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. मात्र किमान सोमवापर्यंत अशी कारवाई केली जाणार नाही, असे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट करून अप्रत्यक्षपणे कॅलिब्रेशनची मुदत वाढवली. सोमवारी परिवहन विभागाकडून राज्य सरकारला मुदतवाढ मागण्यासंबंधीचा अधिकृत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. १० डिसेंबपर्यंत मुदतवाढ करावी, असे या प्रस्तावात म्हटले असल्याचे समजते.
रिक्षा-टॅक्सीच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी परिवहन विभागाकडे पुरेशा सुविधा नसतानाही त्यांनी घाई कशासाठी केली, असा प्रश्न मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियनचे सहसरचिटणीस शशांक राव यांनी उपस्थित केला आहे. सरकारने स्वत:हूच मुदतवाढ जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली. आवश्यक असणारे सुटे भाग उपलब्ध नाहीत, तपासणीच्या सुविधा नाहीत, असे असताना केवळ दलालांना फायदा करून देण्यासाठीच ही घाई केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षांना जुने भाडे द्यावे, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतने केली असून त्यास शशांक राव यांनी विरोध दर्शवला आहे. सरकारने सुविधा दिल्या नाहीत, त्यात टॅक्सी-रिक्षामालक-चालकांचा काय दोष, असा प्रश्नही राव यांनी केला. कॅलिब्रेशन न झालेल्या टॅक्सीच्या चालकांना जुन्या दराने भाडे द्यावे, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने स्पष्ट केले आहे. आम्ही जुन्या दराने भाडे घ्यायला तयार आहोत. मात्र आमचा कॅलिब्रेशनला विरोध आहे, असा अर्थ त्यातून काढू नये. दिवाळी व शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत निर्माण झालेला तणाव यामुळे आठ दिवस वाया गेले आहेत. त्यामुळेच ई-मीटरच्या कॅलिब्रेशनला किमान १५ डिसेंबपर्यंत, तर मेकॅनिकल मीटरच्या कॅलिब्रेशनला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी केली आहे. या संदर्भात परिवहन विभागाला त्यांनी पत्रही पाठवले आहे.