एसटीच्या २२ अधिकृत थांब्यांवर महामंडळाकडूनच सेवा

राज्यभरात लांबच्या प्रवासादरम्यान एसटीच्या गाडय़ा चहापाण्यासाठी हॉटेलचालकांकडून प्रवाशांची लूट होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने खास  ‘३० रुपयांत चहा-नाश्ता’ ही योजना आणली आहे. ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या योजनेची माहिती अजूनही प्रवाशांपर्यंत पोहोचली नसल्याने आता दिवाळीची संधी साधून एसटीने आपल्या वाहकांद्वारे प्रवाशांना या योजनेबाबतची पत्रके देण्यास सुरुवात केली आहे. सध्या २२ अधिकृत थांब्यांवर ही योजना लागू असून या ठिकाणी हॉटेलचालकाने जादा दर आकारणी केली, तर त्या मालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना चहा-नाश्ता करता यावा, यासाठी एसटी महामंडळातर्फे त्यांच्या आगारांशिवाय इतर काही थांब्यांवरही गाडय़ा थांबवल्या जातात. ठिकठिकाणच्या हॉटेलचालकांसह महामंडळाने त्यासाठी करारही केले होते. मात्र या ठिकाणी एसटीच्या गाडय़ा हमखास थांबत असल्याने येथील हॉटेलचालकांनी जादा दर आकारणी करत पदार्थाची विक्री सुरू केली होती. याबाबतच्या तक्रारी महामंडळाकडे अनेकदा आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाने या परिस्थितीचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला. या उपाहारगृहाच्या चालकांकडून अधिक दर आकारणी झाल्यास  तसेच त्याबाबत त्याच्या तक्रारी महामंडळाकडे गेल्यास त्याची चौकशी होणार आहे.

अशी आहे योजना..

  • या योजनेनुसार एसटीच्या प्रवाशांना शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली, मेदुवडा यांपैकी एक पदार्थ आणि एक कप चहा एवढा ऐवज फक्त ३० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
  • सध्या २२ अधिकृत थांब्यांवर सुरू झालेली ही योजना लवकरच राज्यभरातील आणखी १०० थांब्यांवर सुरू करण्याचा विचार