समाजमाध्यमांवर मत व्यक्त केले म्हणून नगर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सोमनाथ वाजे यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. वाजे हे उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे आदिवासी भागांतील शाळेला ‘आयएसओ’ नामांकन मिळाले आहे. अशा शिक्षकावर फुटकळ कारणास्तव करण्यात आलेल्या कारवाईमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याबाबत वारे यांनी मत मांडले होते. खरे तर यावर समाजमाध्यमांवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. यात अनेक शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, कार्यकर्ते यांचा सहभाग आहे. परंतु वारे यांनी मत मांडल्याने विभागाची बदनामी झाल्याचा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली.
शिक्षकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. त्यामुळे वारे यांच्या विरोधातील कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे.