बारावीची परीक्षा १९७५ पासून सुरू झाल्यानंतर काही किरकोळ अपवाद वगळता राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमात फारसा बदल झालेला नाही. वर्षांनुवर्षे एकसुरी पद्धतीने शिकविण्याची सवय झाल्याने अनुभवी शिक्षकांनाही सीबीएसईच्या धर्तीवरचा नवा सखोल आणि विस्तृत अभ्यासक्रम पेलवताना नाकीनऊ येते आहे. जून महिन्यात मास्टर्स ट्रेनर्सना नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचवेळी या शिक्षकांनी नवीन अभ्यासक्रम इतक्या कमी वेळेत शिक्षकांना पेलवणारा नाही, अशी भूमिका मांडली होती. परंतु, केंद्र सरकारच्या समान अभ्यासक्रमाच्या धोरणाची अंमलबजावणी टाळणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही हे बदल अपरिहार्यपणे स्वीकारावे लागत आहेत. परिणामी अपुऱ्या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचीच पुरेशी तयारी झालेली नाही.यशवंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. बी. चव्हाण यांची या संदर्भातील प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. विषयाला न्याय देता यावा यासाठी ते स्वत: आधी तीनचार पुस्तके वाचून, संकल्पना नीट समजून घेऊनच वर्गात शिकविण्यासाठी येतात. पण, आता नवीन अभ्यासक्रम सखोलपणे समजून घेण्याच्या दृष्टीने आम्हालाही रट्टा मारून अभ्यास करावा लागतो आहे. पण, अभ्यासक्रम इतका मोठा आहे की परीक्षा तोंडावर आली तरी आमचा अभ्यास सुरूच आहे, असे ते सांगतात. या सगळ्यांचा परिणाम बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता असून या वर्षी गुणांची टक्केवारी निश्चितपणे कमी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
* विद्यार्थ्यांची नाराजी
विद्यार्थ्यांची हतबलता फेसबुक, ट्विटर यांच्या माध्यमातूनही व्यक्त होते आहे . education.oneindia.in सारख्या शिक्षणविषयक घडामोडींची माहिती देणाऱ्या संकेतस्थळांवरही हे चित्र दिसून येते. या संकेतस्थळावर राज्य शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्य विषयांमधील अंतर वाढविण्याची मागणी केली आहे.

हनुमान उडी
सीबीएसईचा अभ्यासक्रम पहिलीपासून बारावीपर्यंत हळुहळू एका ठरावीक टप्प्याने विस्तारत जातो. पण, पहिलीपासून राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर शिकलेल्या राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर एक मोठी उडी मारून अकरावी-बारावीच्या सुधारित अभ्यासक्रमाची पाठय़पुस्तके सोपविण्यात आली. हे आपल्या विद्यार्थ्यांवर खूपच अन्याय करणारे आहे.
प्रा.मयुर मेहता, मिठीबाई महाविद्यालय

* अभ्यासक्रम तोच, वेटेज कमी
अभ्यासक्रम वाढल्याने प्रकरणनिहाय वेटेजही कमी झाले आहे. उदा. गणितात प्लेन आणि लाइन या विषयाला तीन गुणांचे वेटेज होते. आता या विषयात दोन अधिकच्या प्रकरणांची भर पडली आहे. पण, त्याचे वेटेज आहे दोन. काही प्रकरणांच्या बाबतीत तर नेमके वेटेजही न दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. गणितात थेरमवर प्रश्न असणार की नाही हे स्पष्ट नाही.
प्रा. सुनील घाडगे (गणित), साठय़े महाविद्यालय