राज्याच्या गृह खात्याने गुन्हा घडल्यावर गुन्ह्याचा पंचनामा करतांना सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून नेमण्याचे आदेश काढले आहेत. या कामात पोलीस ठाण्यातून शिक्षकांनाही बोलावणे येत असल्यामुळे शिक्षकांना अनेकदा विद्यार्थ्यांना शिकविणे सोडून गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी पळावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे.
राज्य शासनाने या आदेशातून शिक्षकांना वगळावे यासाठी आमदार रामनाथ मोते यांनी गुरुवारी राज्याचे गृहमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची भेट घेऊन शिक्षकांना या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी केली. त्यावर तातडीने कार्यवाही करून शिक्षकांना या कामातून वगळण्यात येईल असे आश्वासन डॉ रणजीत पाटील यांनी दिले. एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपासी अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनामाच्यावेळी उपस्थित पंचाचे जबाब खटल्याच्या सुनावणी दरम्यान महत्त्वपूर्ण ठरतात.