हलक्या सरींनी मध्य रेल्वेचे तिन्ही मार्ग कोलमडले; सिग्नल यंत्रणा, पेंटाग्राफ, ओव्हरहेड वायरचा बिघाड
पावसाळ्याला तोंड देण्यासाठी रेल्वे सज्ज असल्याचे दावे केले जात असतानाच बुधवारी हलक्या सरींनीच मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या तिन्ही मार्गावर ठिकठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन मुंबईकरांचे मेगाहाल झाले. सिग्नल यंत्रणेत बिघाड, पेंटोग्राफ, ओव्हरहेड वायर तुटणे, वीज पुरवठा खंडित होणे, हे सर्व बिघाड एकाच वेळी ठरावीक अंतराने झाल्याने रेल्वेसेवा पुरती कोलमडली. मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीच्या मुहूर्तालाच या रेल्वे गोंधळाची सलामी लाभली आहे. तब्बल ८० सेवा रद्द झाल्याने प्रवाशांचा असंतोष उफाळून आला होता.
मध्य रेल्वे मार्गावरील शीव-मांटुगा, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर अशा चार ठिकाणी रात्री सव्वा आठच्या सुमारास पेंटोग्राफमध्ये बिघाड झाला. त्यामुळे धीमी व जलद वाहतूक विस्कळीत झाली. त्याचवेळी हार्बर मार्गावरील माहीम स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या पेंट्रोग्राफमध्ये बिघाड झाला. त्यात विक्रोळी येथे सर्वच सिग्नल बंद पडल्याने गोंधळात अधिकच भर पडली. मुख्य आणि हार्बर मार्गावरील हा गोंधळ कमी म्हणून की काय, ट्रान्स हार्बरवर ऐरोली येथे रात्री ८.४० वाजता एका गाडीमध्ये बिघाड झाला. यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य तसेच दोन्ही हार्बर मार्गावरील सेवा बंद पडली.
सीएसटीहून एकही गाडी सुटणार नाही, अशी घोषणा रात्री साडे दहाला झाल्याने प्रवाशांच्या उरात धस्स झाले होते. मात्र काही वेळातच प्रवाशांना वाशीपर्यंत जाऊन ट्रान्स हार्बरने प्रवासाची मुभा देण्यात आली. अर्थात या मार्गावरही आनंदीआनंदच होता त्यामुळे प्रवाशांचे हाल संपले नाहीत. लांब पल्ल्याच्या गाडय़ांचाही खोळंबा झाला होता. दादर स्थानकात तर जागा मिळेल तिथे प्रवाशांनी पथारी पसरली होती. अध्र्या तासाच्या प्रवासासाठी अडीच तास लागत होते. त्यातही खच्चून भरलेल्या सर्व गाडय़ा कित्येक मिनिटे एकाच जागी खोळंबून राहिल्या आणि पंखेही बंद झाल्याने प्रवाशांनी रेल्वेविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. बुलेट ट्रेनचे वायदे सुरू असताना छोटय़ा सरींच्या एका फटक्यात मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे कोलमडली तर ऐन पावसाळ्यात काय होईल, असा सवाल प्रवासी करीत होते. एकाच वेळी इतके गोंधळ होतात कसे, त्याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, इतक्या वेळा मेगाब्लॉक घेऊनही तांत्रिक बिघाड होतातच कसे, मुंबईत राज्य करू पाहणारे वाघ आणि सिंह आहेत कुठे, असे संतप्त प्रश्नही प्रवासी करीत होते.

२५ दिवसांत २६ गोंधळ
डीसी-परिवर्तनाचे काम पूर्ण झाल्यानंतरही हार्बर मार्गावर सर्वाधिक गोंधळ होत आहे. यात गेल्या २५ दिवसांत हार्बरवर २६ वेळा बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. यात युनिट फेलच्या कारणांमुळे बिघाड होत असल्याचे सांगितले जात आहे.

ठाणे-डोंबिवली ६०० रुपये!
रेल्वेच्या गोंधळामुळे अचानक ‘भाव’ वधारलेल्या टॅक्सी चालकांनी प्रवाशांचा अक्षरश: खिसा कापला. ठाणे ते डोिबवली या प्रवासासाठी टॅक्सी चालक माणशी ४०० ते ६०० रुपये आकारत होते. मात्र इतर पर्याय नसल्याने प्रवासी हतबल होते.

पारसिक बोगद्यात ४० मिनिटांचा थांबा!
पारसिक बोगद्यातून रेल्वे गाडी जाताना जीव कासावीस होत असतो. याच बोगद्यात तब्बल ४० मिनिटे बदलापूरला जाणारी एक गाडी थांबून होती. त्यात या गाडीतील दिवे आणि पंखेही बंद पडल्याने प्रवाशांचा संताप शिगेला पोहोचला होता.

 

Untitled-25