विठ्ठलवाडी येथे एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. शनिवारी या बलात्कारपीडित तरुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. एप्रिल महिन्यात तीन जणांनी आपले अपहरण करून चालत्या मोटारगाडीत बलात्कार केल्याचा जबाब या तरुणीने पोलिसांना दिला आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता विठ्ठलवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
याबाबत माहिती देताना भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी केईएम रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या निशा (नाव बदलले आहे) या १९ वर्षीय तरुणीने बाळाला जन्म दिला. तिने पतीच्या नावाबाबत माहिती न दिल्याने रुग्णालय प्रशासनाने भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधला. त्या वेळी निशाने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
एप्रिलमध्ये माझे वडील आजारी होते. त्यांच्यावर विठ्ठलवाडी येथीस आशीर्वाद रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात त्यांच्यासाठी मी जेवणाचा डबा घेऊन जायची. १७ एप्रिल रोजी दुपारी जेवणाचा डबा घेऊन जात असताना एक गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीतील दोघांनी मला बळजबरीने गाडीत ओढून घेतले आणि एक इंक्जेशन दिले. त्यामुळे मी बेशुद्ध पडली. जेव्हा मी शुद्धीवर आली तेव्हा माझ्यावर बलात्कार झाल्याचे लक्षात आले, असे निशाने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. कारमध्ये चालकासहित तिघेजण होते. माझ्यावर बलात्कार केल्यानंतर त्यांनी मला गाडीतून बाहेर ढकलून दिले, असे तिने सांगितले. यापैकी एक जण माझ्याबरोबर महाविद्यालयात होता. तो मला नेहमी त्रास द्यायचा, पण त्याचे नाव मला माहीत नाही, असे तिने सांगितले. दरम्यान, भोईवाडा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात लोकांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास करणारे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांनी सांगितले की, सदर पीडित तरुणीच्या जबाबाची आम्ही पडताळणी करीत आहोत. नुकतीच ती बाळंत झाली असल्याने आम्ही तिचा सखोल जबाब नोंदवलेला नाही. तिने या तीन लोकांच्या वर्णनाबाबतही ठोस माहिती दिलेली नाही. तिच्याकडून अधिक माहिती मिळाल्यानंतर आरोपींना जेरबंद करता येईल, असे ते म्हणाले.