चेंबूरमधील अनोख्या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींची कल्पकता

किशोरवयीन मुलींच्या नजरेतून हिंसा म्हणजे काय, हे जाणून घेण्याचा एक अनोखा प्रयत्न कोरो संस्थेच्या महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी चेंबूर येथे करण्यात आला.

या कार्यक्रमात मेंदीच्या माध्यमातून मुलींवर, स्त्रियांवर होणारी हिंसा मांडण्याचा प्रयत्न चेंबूर भागातील वस्त्यांमधील मुलींनी केला आहे. या आगळ्यावेगळ्या मेंदी स्पर्धेत ९९ मुली तर एका मुलाने सहभाग घेतला होता.

‘कोरो’ संस्थेच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार व सामाजिक नियम या विषयाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबई, अहमदनगर, नाशिक या भागामध्ये गेली काही वर्षे विविध उपक्रम राबविण्यात येतात.

यात सणांचे औचित्य साधून  सासू-सून, नणंद-भावजय यांचा व्हॅलेंटाइन डे, होळीच्या वेळेस आई-बहिणींना उद्देशून असणाऱ्या शिव्यांची होळी, नवरात्रीला शिवीबंदी आदी उपक्रम केले जातात. यंदा दिवाळीनिमित्ताने मेहंदीच्या स्पर्धेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. १० ते २२ वर्षांतील मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेंदी स्पर्धेमध्ये चेंबूर, बैगनवाडी, शिवाजीनगर, वाशीनाका या भागातील ९९ मुली आणि एक मुलगा असे एकूण १०० स्पर्धक सहभागी झाले होते. या मुलींनी पाहिलेला, अनुभवलेला स्त्री-मुलीवरील हिंसाचार मेहंदीच्या माध्यमातून कागदावर मांडला आहे. यामध्ये बहुतांशी मुलींनी कौटुंबिक हिंसाचारामध्ये आई, मुलगी, सुनेची होणारी कुचंबणा, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, दारू पिऊन मारणारा नवरा असे विविध प्रसंग, घटना यामधून आजूबाजूला घडणाऱ्या, वस्तीमध्ये रोज नजरेला पडणाऱ्या हिंसेचे स्वरूप रंगविले आहे, अशी माहिती कोरो संस्थेच्या मुमताज शेख यांनी दिली आहे.