मुंबईतील सर्वेक्षणातील निष्कर्ष; व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकवर सर्वाधिक तरुणाई

व्यक्त होण्याच्या विविध  व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकच्या तुलनेत तरुणांना  ‘इन्स्टाग्राम’ने भुरळ घातली आहे. एका आयटी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईतील जवळपास ७९ टक्के मुले स्मार्ट फोनचा वापर करतात; मात्र त्यांच्यात फेसबुकपेक्षाही इन्स्टाग्राम सर्वाधिक लोकप्रिय आहे.

वय वर्षे १२ व त्या पुढील वयाच्या तरुणांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधीच्या सवयी तपासण्याकरिता ‘टाटा कन्सलटन्सी सव्‍‌र्हिसेस’ ने (टीसीएस) नुकतीच एक पाहणी केली. त्यात भ्रमणध्वनी, संगणक, टॅब्लेट आदी तंत्रज्ञानाच्या विविध साधनांच्या वापराचे प्रमाण पौंगडावस्थेतील मुले व तरुण कसे करतात, हे तपासण्यात आले.

या मुलांमध्ये स्मार्टफोनचा वापर जास्त होतो. तर टॅब्लेट व लॅपटॉप वापरण्याचे प्रमाण प्रत्येकी ३९ टक्के व ७० टक्के आहे. तसेच इतर अत्याधुनिक गॅझेट्चेही त्यांना आकर्षण आहे.

केवळ गॅझेट्सच नव्हे तर  लोकप्रिय अ‍ॅपचीही पाहणी या वेळी करण्यात आली.

दूरदूरच्या मित्रमंडळींना व आप्तांना जोडणारा लोकप्रिय अ‍ॅप म्हणजे फेसबुक. एकूण ५४ टक्के विद्यार्थी या अ‍ॅपचा वापर करीत आहेत; मात्र फेसबुकइतकेच ‘इन्स्टाग्राम’ही तरुणांना जवळचे वाटते आहे.

५२ टक्के मुलांकडून त्याचा वापर केला जातो. तसेच इतर लोकप्रिय अ‍ॅप म्हणजे गुगल प्लस (३० टक्के), ट्विटर (२७ टक्के) मुलांच्या वापरात आहेत.

विविध संदेशवाहक अ‍ॅप म्हणजे मेसेंजर (६० टक्के),  व्हॉट्स अ‍ॅप(८८ टक्के), स्नॅपचॅट (४१ टक्के), हाईक (३५ टक्के), फेसबुक मेसेंजर (६० टक्के) यांचा वापर होतो.

वेळही वाया जातो

या सर्वासह अनेक शैक्षणिक अ‍ॅप्सचा ४८ टक्के वापर होतो. तर मनोरंजनात्मक अ‍ॅप्स ५३ टक्के वापर होतो. तसेच खेळ व बातम्या सांगणारे अ‍ॅप प्रत्येकी ६८ टक्के व ३३ टक्के या प्रमाणात वापरात आहेत. या सगळ्यांत काही मुलांचे असेही मत आहे की समाजमाध्यमांमुळे वेळही वाया जातो. त्यामुळे त्याच्या वापरावर बंधने घातली गेली पाहिजे.