आजपासून गाडीची नियमित सेवा सुरु ; आठवडय़ातून पाच दिवस गाडी धावणार

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली ‘तेजस’ एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून गोव्यातील करमाळी रेल्वेस्थानकात अवघ्या आठ तासांमध्ये पोहोचली.

सोमवारी दुपारी चारनंतर निघालेली ही गाडी साडेआठ तासात करमाळीला पोहोचणे अपेक्षित होते. पण ‘तेजस’ने हे अंतर अवघ्या आठ तासांमध्ये पार केले आणि रात्री साडेबारावाजता गाडी करमाळी येथे पोहोचली.

बुधवारपासून या गाडीची नियमित सेवा सुरु होणार असून ही एक्स्प्रेस मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी आठवडय़ातून पाच दिवस धावणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पहाटे पाच वाजता सुटलेली ही गाडी करमाळीत दुपारी १.३० वाजता दाखल होणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी दुपारी २.३० वाजता करमाळीहून सुटून छत्रपती शिवाजी टर्मिनसला रात्री ११ वाजता पोहोचणार आहे.  पावसाळ्यात ‘तेजस’ एक्सप्रेस आठवडय़ातून तीन दिवस (दर सोमवार, बुधवार आणि शनिवार) चालविली जाणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पहाटे ५ वाजता गाडी सुटणार आहे. तर परतीच्या प्रवासात करमाळी येथून सकाळी ७.३० वाजता दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुटणार आहे.

तेजस एक्सप्रेसची खानपान यादी    

मध्य रेल्वेने या गाडीचे मेन्यूकार्ड आणि दरपत्रकही प्रसिध्द केले आहे. नाश्त्यासाठी १२२ ते १५५ रुपये तर जेवणासाठी २२२ ते २४४ रुपये आणि चहासाठी ६६ ते १०५ रुपये मोजावे लागतील. प्रवासात पाण्याची बाटली, वृत्तपत्रासाठी वेगळे२० रुपये आकारण्यात येणार आहेत.

आरक्षण फूल्ल

तेजस एक्स्प्रेस पहिल्या फेरीतच लोकप्रिय झाली असून पुढील चार दिवसांचे आरक्षण फूल्ल झाले असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.