दोन महिन्यांपासून सुरुवात; १२०० कैद्यांवर उपचार

अहमदनगरच्या तुरुंगातील एका कैद्याच्या पोटाच्या आजाराची तपासणी सुरू होती. मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णाच्या आजाराची माहिती समोरच्या पडद्यावरून घेतली आणि आजाराचे निदान झाले. उपचारही ठरले.. राज्यातील ९० टक्के तुरुंगांतील कैद्यांसाठी अशा प्रकारची ‘टेलिमेडिसिन’ सेवा सुरू झाली असून जवळपास १२०० कैद्यांवर ‘टेलिमेडिसिन’द्वारे उपचार करण्यात आले आहेत.

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी या योजनेला गती देण्याचा निर्णय घेऊन माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या समितीकडे तुरुंगातील कैदी व शासकीय रुग्णालयांमध्ये समन्वय साधून ’टेलिमेडिसिन’ सेवेला गती देण्याची जबाबदारी सोपवली. गेल्या दोन महिन्यांत राज्यातील बहुतेक तुरुं ग व रुग्णालये यांच्यात ‘टेलिमेडिसिन’ सेवा सुरू होऊन कैद्यांना तुरुंगातच आरोग्य उपचार मिळू लागले. तुरुंगातील ज्या कैद्यांच्या आरोग्याच्या तक्रारी असतात त्या सामान्यपणे तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून सोडविण्यात येतात. तथापि गंभीर आजाराच्या कैद्यांची सविस्तर माहिती घेऊन रुग्णाला तुरुंगातच ‘टेलिमेडिसिन’च्या माध्यमातून डॉक्टरांकडून तपासून औषधोपचार केला जातो.

पुण्यातील येरवडा कारागृह हे बी. जे. मेडिकल व ससून रुग्णालयाशी जोडण्यात आले आहे, तर मुंबई मध्यवर्ती कारागृह हे जे. जे. रुग्णालयाशी जोडण्यात आले आहे. याशिवाय औरंगाबाद, तळोजा, अमरावती आदी मध्यवर्ती कारागृहे आणि अलिबाग, सावंतवाडी, अहमदनगर जिल्हा तुरुंग हे संबंधित जिल्हा रुग्णालयांशी टेलिमेडिसिनच्या माध्यमातून जोडण्यात आली आहेत.

अहमदनगरचा जिल्हा तुरुंग हा शुक्रवारीच तेथील जिल्हा रुग्णालयाशी टेलिमेडिसिनद्वारे जोडण्यात आला असून राज्याचे अपर पोलीस महासंचालक उपाध्याय आणि आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी यासाठी विशेष मेहनत घेतल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

अनेक कैदी कुपोषित

राज्यातील बहुतेक तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असून यातील बरेचसे कुपोषित तसेच त्वचेच्या आजाराने त्रस्त आहेत. अनेकांना खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयीमुळे पोटापासून हृदयविकारापर्यंत अनेक आजार असून या कैद्यांना तुरुंगातून शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी नेण्यास पुरेसे पोलीस बळ नाही. यामुळे उपचारासाठी रुग्णालयात नेण्याबाबत रुग्ण कैद्यांकडून न्यायालयांकडे याचिका केली जाते. यावर उपाय म्हणून कारागृहे व रुग्णालये यांच्यात टेलिमेडिसिन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तुरुंगातील रुग्णांना टेलिमेडिसिनद्वारे उपचार करण्याचा निर्णय जुनाच असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे आजपर्यंत झाली नव्हती. माझी भूमिका ही संबंधित सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय साधून कैद्यांना उत्तम उपचार मिळणे ही होती. तुरुंग अधिकारी, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागांत समन्वय साधून ही योजना अवघ्या दोन महिन्यांत मार्गी लावू शकलो. यामुळे उपचाराच्या नावे तुरुंगातून कैदी पळून जाण्याची शक्यताही कमी झाली आहे.

 – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक