मुंबईत ३८.६, रत्नागिरीत ३९.३ तापमान

राज्यात निर्माण झालेल्या उष्ण लहरींमुळे मुंबई आणि कोकण पुरते घामाघूम झाले आहेत. शनिवारी मुंबईचा पारा ३८.६ अंशांवर होता. तर रत्नागिरीत ३९.३ आणि वेंगुल्र्यात ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आता यापुढे पारा खाली येण्याऐवजी वर चढत जाईल आणि त्याची झळ मुंबई, कोकणात जाणवेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात प्रति चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागराकडून पश्चिम भारतात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा जोर वाढला आहे. त्यापुढे मुंबई किंवा किनारपट्टीला थंड करणाऱ्या(समुद्राकडून जमिनीवर वाहणाऱ्या) वाऱ्यांचा निभाव लागत नाही. परिणामी मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये अचानक उष्णता वाढली आहे. कोरडे हवामान, कमी उंचीवरून वाहणारे वारे यावरून हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाल्याचे संकेत वेधशाळेकडून देण्यात आले. उत्तरोत्तर तापमानात वाढ होईल, असा इशाराही वेधशाळेकडून देण्यात आला. रत्नागिरीत शनिवारी नोंद झालेले(३९.३) तापमान सर्वोच्च आहे. २५ फेब्रुवारी १९४५ रोजी रत्नागिरीचे सर्वोच्च तापमान ३८.३ इतके नोंदवण्यात आले होते.