मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारामुळे मुंबई-ठाण्यातील राजकीय हवा तापलेली असतानाच पाऱ्यानेही उसळी घेतली आहे. गेल्या चार दिवसांपासून उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवू लागले असून शनिवारी कमाल तापमान तब्बल ३८.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान गेल्या दहा वर्षांतील फेब्रुवारीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान आहे. सकाळचा गारवा गायब झाला असून किमान तापमानही २० अंश से. पर्यंत जाऊन पोहोचले आहे. आणखी चार ते पाच दिवस तापमानात फारसा उतार होण्याची शक्यता नाही, असे हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या दहा वर्षांतील फेब्रुवारीतील तापमानाचा विचार करता महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात थंडी असते तर दुसऱ्या पंधरवडय़ात तापमान वाढायला सुरुवात होते. त्यातही फेब्रुवारीतील सर्वात जास्त तापमान शेवटच्या आठवडय़ात नोंदले गेले आहे. यावेळी १२ फेब्रुवारी रोजी या महिन्यातील सर्वात कमी तापमान, १४. २ अंश से. ची नोंद झाली होती. मात्र आता तापमान वाढत आहे. सकाळचे किमान तापमान सरासरीपेक्षा ७ अंश से. ने अधिक आहे. त्याचवेळी कमाल तापमानही सरासरीपेक्षा ७ अंश से. ने वाढले आहे. शहराच्या तापमानावर समुद्रातील वाऱ्यांचा प्रभाव असतो. साधारणत दुपारी अकरा- बारा वाजता पश्चिमेकडून तुलनेने गार वारे आले की दुपारचे तापमान वाढत नाही. मात्र सध्या हे वारे दुपारी दोननंतर येत  असल्याचे सूत्रांनी सांगितले.

untitled-21