मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास खंडाळा बोरघाटात एका टेम्पोने अचानक पेट घेतला. यामध्ये टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला. हा टेम्पो मुंबईहून पुण्याकडे निघाला होता. या घटनेमुळे मुंबई-पुणे वाहतुकीवर परिणाम झाला. काही काळ धीम्यागतीने वाहतूक सुरू होती.
खोपोली महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, विद्युत साहित्य व कपडे घेऊन टेम्पो (एचआर ६१ बी १२४३) पुण्याकडे निघाला होता. घाटात टेम्पो आल्यानंतर शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यामध्ये टेम्पोतील साहित्य आणि टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला.
या घटनेनंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. साडेनऊच्या सुमारास आयआरबी कंपनीचे तीन व खोपोली नगरपरिषदेच्या एका अग्निशामक बंबाने ही आग विझविण्यात आली. दरम्यान विस्कळीत झालेली वाहतूक पुर्वपदावर येण्यास आणखी तासभर लागण्याची शक्यता महामार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे.