मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) तब्बल ७३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रशासनात खळबळ उडवून दिली. आता आणखी दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे आधीच्या बदल्यांमध्येही किरकोळ फेरफार करण्यात आला आहे.
राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर मंत्री आणि सचिव यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला. सचिव ऐकत नाहीत, अशी अनेक मंत्र्यांची तक्रार होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सरकारला दाद देत नाहीत, अशी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही किरकोळ स्वरूपात अधिकाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली; परंतु या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ७३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मागील बदल्यांमुळे काही अधिकारी नाराज झाले व ते बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यामुळे पुन्हा आधीच्या बदल्यांमध्ये काही फेरफार करावा लागला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. त्या पदावर जाण्यास चहांदे यांनी नकार दिल्याचे कळते. त्यामुळे कुटुंब कल्याण आयुक्त आय. ए. कुंदन यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.