‘टोफेल’ परीक्षेत अव्वल कामगिरी करणाऱ्या भारतातील दहा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाकरिता तब्बल ७० हजार अमेरिकी डॉलर्सची शिष्यवृत्ती देऊ केली आहे. यात मुंबई, ठाणे, पुण्यातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एज्युकेशन टेस्टिंग सव्‍‌र्हिसच्या वतीने टोफेल ही परीक्षा घेतली जाते. परदेशात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेची चाचणी या परिक्षेद्वारे केली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून १३० देशांमधील तब्बल नऊ हजार शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग खुला होतो. टोफेलच्या कार्यकारी संचालक जेनिफर ब्राऊन यांनी शिष्यवृत्तीकरिता निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. गेल्या चार वर्षांत ३,१०,००० अमेरिकी डॉलर्सची शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना बहाल करण्यात आली आहे. पूर्वी बेलूर या मुंबईच्या, अझालिया इराणी या पुण्याच्या, ग्रिश्मा जेना या ठाण्याच्या मुलींचा समावेश आहे.