रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी वाणिज्य बँकांसाठी जारी केलेल्या निर्देशांनुसार, १० वर्षांखालील अजाण बालकांना त्यांच्या नावाने स्वतंत्रपणे बचत खाते बाळगण्याबरोबरच त्यात व्यवहार करण्याची, तसेच एटीएम आणि धनादेश पुस्तिकेची सुविधाही मिळविता येईल असे स्पष्ट केले. आजवर अजाणांना बँकेत बचत खाते उघडण्याची मुभा असली तर अशा खात्यांवर आई अथवा वडीलांना सह-खातेदार केले जात असे. मात्र आता १० वर्षांखालील बालकांना विहित रकमेपर्यंत बचत खात्यात रक्कम जमा करण्याबरोबरच काढताही येईल. असे स्वतंत्र खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असावीत, याचा निर्णय बँकांनी करावयाचा आहे. सध्या सह-खातेदार म्हणून पालकांसह अजाणांचे बँकेत खाते असल्यास, त्या खात्यांत नव्या निर्देशांनुसार व्यवहाराच्या मुभेच्या संबंधितांना नव्याने सूचना देऊन, अजाण खातेदाराच्या सहीचा योग्य तो नमुना घेऊन तो बँकेच्या दफ्तरी नोंद केला जावा, असे रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकांना सूचित केले गेले आहे.