२०११मध्ये मुंबईत मोठय़ा प्रमाणात साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा इंडियन मुजाहिद्दीनचा डाव होता. इतकेच नव्हे तर गर्दीच्या जवळपास सर्वच ठिकाणांची यासिन, वकास तसेच असादुल्लाह या तिघांनी पाहणी केली होती, अशी माहितीही चौकशीदरम्यान उघड झाली आहे. त्यांनी तब्बल ३० ते ४० ठिकाणांची त्यांनी पाहणी केली असावी, असा अंदाज राज्याच्या दहशतवादविरोधी पथकातील सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाचे मुख्यालय, पोलीस आयुक्तालय ही मुख्य लक्ष्ये होतीच. परंतु अंधेरीतील मॅकडोनाल्ड तसेच बोरिवली-कांदिवलीतील गर्दीची रेल्वे स्थानकेही इंडियन मुजाहिद्दीनच्या रडारवर होती. मात्र या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचा कट आखला होता किंवा नाही, हे कळू शकलेले नाही. या ठिकाणी बॉम्ब ठेवणे सहज शक्य होते. परंतु आपले काही साथीदार पकडले गेल्याने आपल्या योजनेमध्ये बदल झाल्याचेही यासिनने स्पष्ट केल्याचे कळते. यासिन आणि असादुल्लाह हे सध्या दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात आहेत. या पथकाचे प्रमुख व अतिरिक्त महासंचालक राकेश मारीया हे स्वत: या दोघांची कसून चौकशी करीत आहेत.