परमार आत्महत्या प्रकरण : आरोपी नगरसेवकाच्या खात्यातून रक्कम वळती
ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणाला सोमवारी नवे वळण मिळाले. या प्रकरणातील चार नगरसेवक आरोपींपैकी नजीब मुल्ला यांच्या बँक खात्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात १.७० कोटी रुपये जमा करण्यात आले होते. या व्यवहाराचा परमार यांच्या आत्महत्येशी संबंध आहे का, हे पडताळून पाहायचे आहे, असे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले. या चारही नगरसेवकांच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली. परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी हनमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला या चार नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर या चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा दिलेला आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सध्या अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सोमवारी सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी या चौघांच्या कोठडीची आवश्यकता स्पष्ट केली.

सूरज परमार यांच्या विरोधातील तक्रारींचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केला, असा या नगरसेवकांचा दावा आहे. परंतु ठाण्यात बरीच बेकायदा बांधकामे आहेत. त्याबाबत आरोपींनी लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य का बजावले नाही? परमार पूर्ण निर्दोष आहेत असे आमचे म्हणणे नाही, परंतु आरोपींनी त्यांना पैशांकरिता टोकाला जाऊन छळल्यामुळेच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा दावाही ठाकरे यांनी केला. ठाकरे यांचा युक्तिवाद मंगळवारीही सुरू राहणार आहे.