हिंदू संस्कतीच्या रक्षणासाठी गुन्हा दाखल झाल्याचा आनंद असल्याचे वक्तव्य मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले. जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यामध्ये कायद्याचे उल्लंघन करत नऊ थराची सलामी दिल्यानंतर आयोजक अविनाश जाधव यांच्यावर ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये नऊ थर का उभारले अशी, विचारणा केल्याचे जाधव यांनी एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले. जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यामध्ये लावलेल्या नऊ थरामध्ये चिमूकला सलामी देताना दिसला होता. तरीही हंडीमध्ये कोणीही अल्पवयीन नसल्याचा दावा यावेळी जाधव यांनी केला. आम्हाला जे करायचं होत ते आम्ही केलं. आता जे काही करायचं आहे. ते पोलिस करतील असेही ते म्हणाले. मर्यादीत उंचीसोबतच थरामध्ये १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या या निर्बंधाविरोधात फेरविचार करावा, यासाठी जय जवान पथकाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या गोविंदा पथकाची याचिका फेटाळून लावली होती.