वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली प्रकल्पास मुख्यमंत्र्यांची मान्यता
गेल्या काही वर्षांपासून केवळ घोषणा आणि चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या ठाणे मेट्रोला आता गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या सुमारे १४ हजार ४५९ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालास शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. त्यामुळे २०२१ पर्यंत ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते.
सह्य़ाद्री अतिथीगृहात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बठक झाली. या बैठकीत वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ मार्गाच्या अहवालास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाची पूर्णत्वाची किंमत १४ हजार ४५९ कोटी इतकी निश्चित करण्यात आली असून २०२१ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मेट्रो मार्गावर भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टी.टी. आणिक नगर बस डेपो, सुमन नगर, सिध्दार्थ कॉलनी, अमर महल जंक्शन, गरोडिया नगर, पंत नगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्य नगर, गांधी नगर, नवल हाऊसिंग, भांडुप मेट्रो, शांग्रीला मेट्रो, शांग्रीला, सोनापूर, मुलुंड अग्निशमन केंद्र, मुलुंड नाका, तीन हात नाका (ठाणे), ठाणे आरटीओ, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली अशी एकूण ३२ स्थानके असतील. राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळताच या प्रकल्पाच्या निविदा काढण्यात येणार आहेत.

एमटीएचएलचा खर्च १७ हजार कोटींवर
शिवडी : नाव्हाशेवा ट्रान्स हार्बर लिंग रोड(एमटीएचएल) या प्रकल्पाची किंमत आता १७ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पास प्राधिकरणाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली तसेच या प्रकल्पाच्या उभारणीचे काम अधिक गतीमान होण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या २२ किमी लांबीच्या सागरी सेतूमुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्याचा मार्ग गतिमान होणार आहे.

Untitled-30