ठाणे महापालिकेच्या तिजोरीतील धनसंचय वाढविण्यासाठी प्रशासनाने विविध करात वाढ करण्यासंबंधी आणलेल्या प्रस्तावांना बुधवारच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेनेने बहुमताच्या जोरावर अंतिम मान्यता दिल्याने ठाणेकरांवर करवाढीचे संकट ओढवले आहे. या नव्या प्रस्तावानुसार चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या ठाणेकरांच्या पाण्याकरिता दरमहा १३० रुपये, तर निवासी गृहसंकुलातील प्रत्येक घरांना क्षेत्रफळानुसार सुमारे २०० ते ४७० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच मालमत्ता करात अंतर्भूत असलेल्या जललाभ करात पाच टक्के, तर मलनि:सारण करात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही करांच्या वाढीमुळे ठाणेकरांच्या मालमत्ता करातही मोठी वाढ होणार आहे.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पाणी, मालमत्ता, मालमत्ता हस्तांतर अशा विविध करांत वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. तसेच या संबंधीचे प्रस्तावही सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी आणले होते. मात्र, काही कारणास्तव ही सभा होऊ शकली नसल्याने हे प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान बुधवारच्या सर्वसाधारण सभेपुढे हे प्रस्ताव मंजुरीसाठी येताच भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी विरोध दर्शविला आणि हे प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. त्यापाठोपाठ ठाणेकरांना पुरेशा सुविधा पुरविण्यात आलेल्या नसल्याने करवाढीच्या प्रस्तावास काँग्रेस-राष्ट्रवादी लोकशाही आघाडीने विरोध केला. अखेर आयुक्त जयस्वाल यांनी करवाढीमागचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आयुक्त जयस्वाल यांनी पुन्हा स्पष्टीकरण देत या प्रस्तावांना मान्यता देऊ नका, पण या कामासाठी पुन्हा माझ्याकडे येऊ नका, असा धमकीवजा इशारा दिला. त्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी आक्षेप घेताच आयुक्तांनी शब्द मागे घेतले. या प्रस्तावास विरोधी पक्ष मान्यता देण्यास तयार नसल्याचे पाहून महापौर संजय मोरे यांनी या प्रस्तावाकरिता मतदान घेतले. त्यामध्ये प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शिवसेनेने तर प्रस्तावाच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने मतदान केले.
महापौरांसोबत वाद
यामध्ये शिवसेनेला ३९ विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीला २४ मते मिळाली. अखेर मतदानाच्या जोरावर महापौर मोरे यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन ठाणेकरांवर करवाढ लादली. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले असून, या प्रस्तावावरून झालेल्या वादातून त्यांची सभागृहात महापौरांसोबत  मतभेदांतून वाद झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

अशी असेल पाणी दरवाढ
चाळी आणि झोपडय़ांमध्ये राहणाऱ्या ठाणेकरांना सध्या पाण्यासाठी दरमहा १०० रुपये भरावे लागतात. नव्या प्रस्तावानुसार हा दर १३० रुपये करण्यात आला आहे. तर निवासी संकुलातल्या प्रत्येक घरासाठी सध्या दरमहा १८० रुपये पाणी बिल आकारले जात असून ते दर यापुढे घरांच्या क्षेत्रफळानुसार ठरणार आहेत. २०० चौरस फुटांपेक्षा लहान घरांसाठी किमान २०० रुपये, तर अडीच हजार चौरस फुटांपेक्षा मोठय़ा घरांना ४७० रुपये आकारणार आहेत. यामुळे पाणीपट्टीत सुमारे २५ ते ३० कोटींनी वाढ होणार आहे.

३० कोटींची मालमत्ता कर वाढ
मलनि:सारण लाभ कर, जल लाभ करात वाढ करून ठाणेकरांच्या खिशातून अतिरिक्त ३० कोटी रुपये काढले जाणार आहेत. मालमत्ता करात अंतर्भूत असलेला जल लाभ कर सध्या निवासी वापरासाठी सात टक्के तर बिगर निवासी वापरासाठी १२ टक्के आहे. नव्या प्रस्तावानुसार त्यात पाच-पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. सध्या या करातून २६ कोटी ५३ लाख रुपये मिळतात. नव्या दरानुसार ४१ कोटी ३३ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मलनि:सारण लाभ करातही वाढ करण्यात आली असून सध्याचे निवासी (४) आणि बिगर निवासी (७.५) दर पाच टक्कय़ांनी वाढविले जाणार आहेत. सध्याच्या दराने पालिकेला १५ कोटी ९१ लाख रुपये मिळतात. नव्या दरानुसार ती ३० कोटी ७० लाखांवर जाईल.