एका महिलेच्या सांगण्यावरून एका तरुणावर कसलाही पुरावा नसताना विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांवर गुन्हेगारी कट रचणे, कायद्याचे उल्लंघन करणे, खोटे पुरावे सादर करणे, चुकीच्या पद्धतीने कैद करणे  अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 जिमी गोंडा हे व्यायाम शाळेत प्रशिक्षक आहेत. एका महिलेने त्यांच्यावर अश्लिल छायाचित्रे काढल्याचा आरोप करत जेजे मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २८ मार्च रोजी जेजे मार्ग पोलिसांनी जिमी यांना बोलावून त्यांची चौकशी केली. त्यांचा मोबाईल, मेमरी कार्ड, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आदी तपासले मात्र त्यात त्यांना काहीच आढळले नाही. या महिलेच्या आरोपात काहीच तथ्य नसल्याने पोलिसांनी जिमी यांना सोडून दिले होते. दरम्यान, या महिलेने ५ एप्रिल रोजी जिमी यांना सीएसटी येथील मेट्रो सिनेमागृहाजवळ भेटायला बोलावले होते. परंतु जिमी यांनी या महिलेला नकार देत पुन्हा फोन न करण्याची ताकीद दिली होती. तसेच भायखळा पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात अदखलपात्र तक्रारही दाखल केली होती. मात्र ६ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी जिमी यांना या महिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाच्या गुन्ह्य़ाखाली अटक केली होती. जिमी यांनी मेट्रो सिनेमागृहाजवळ भेटायला बोलावून विनयभंग केला असा आरोप या महिलेने केला होता. एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंडुलकर आणि महिला पोलीस उपनिरीक्षक सकपाळ यांनी ही कारवाई केली होती. यानंतर जिमी यांची जामिनावर सुटका झाली होती. या घटनेनंतर जिमी यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला होता. कृष्णप्रकाश यांनी या प्रकरणची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी केलेल्या चौकशीत जिमी हे मेट्रो सिनेमाजवळ गेले नसल्याचे स्पष्ट झाले.