बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णीची अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी गुजरात, मुंबई आणि अन्य परिसरातील आठ बॅंक खाती सील करण्यात आली आहेत. ठाणे पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. ममता कुलकर्णीच्या सील करण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये  ९० लाखांपेक्षा अधिक रक्कम आहे. मालाडमधील बँक खात्यामध्ये ६७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही रक्कम परदेशी चलनात असल्याचे समजते. तर कल्याण, बदलापूर ,ठाणे, परळ, नरीमन पॉइन्ट, धारावी, राजकोट आणि भूजमध्ये स्थित असणाऱ्या बँक शाखेतील ममताच्या खात्यांमध्ये २६ लाख रूपये जमा आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी यापूर्वीच ममताला दोषी ठरविण्यात आले होते. तिच्या जवळ असणाऱ्या संपत्तीमुळे अंमली तस्करीला चालना मिळाल्याच्या संशयावरुन तिची बँक खाती सील करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस ममताची मोठी बहिण आणि अन्य संबंधित व्यक्तिंची देखील याबाबत चौकशी करत आहेत. ‘इफ्रेडीन’ पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीप्रकरणी सबळ पुरावे मिळाल्यानंतर तिच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आले होते. यापूर्वी  तिच्या नावावर ११ लाखांचे शेअर्स आणि वर्सोवा येथे ४ फ्लॅट्स असल्याचे देखील समोर आले होते. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ममता आरोपी असल्याची साक्ष दोन साक्षीदारांनी न्यायालयात दिल्यानंतर पोलिसांनी तिची सर्व मालमत्ता व बँक खात्यांची कसून तपासणी सुरु केली होती.