या रविवारचा मेगाब्लॉक ‘जरा हटके’ असल्याची जाणीव कल्याणपासून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून कल्याण यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना  झाली. रस्तेमार्गाने ठाणे, कळवा येथून दुपारच्या डय़ुटीला जाण्यासाठी निघालेल्या नोकरदारांबरोबरच सहकुटूंब नातेवाईकांच्या भेटीला जाणाऱ्या प्रवाशांचे ्नरविवारी प्रचंड हाल झाले.
मध्य रेल्वेने शनिवारी रात्रीपासून मेगाब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केले. त्याचा फटका रात्री ११ वाजता शिफ्ट संपल्यावर घराकडे निघालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना बसला. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने रात्री ११ वाजल्यानंतर वेळेत निघालेल्या लोकल कांजूरमार्ग, भांडूप रेल्वेस्थानकांच्या नंतर अतिशय धीम्या गतीने आणि २०-२० मिनिटे थांबत ठाण्याकडे कूच करीत होत्या.
रविवारी दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वेस्थानकातून कल्याण व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या गाडय़ांचे फलाट बंद होते आणि त्यामुळे फलाट ५ व ६ वरून गाडय़ा सोडण्यात येत असल्याची उद्घोषणा केली जात होती. परंतु, प्रत्यक्षात गाडय़ा येतही नव्हत्या आणि जातही नव्हत्या. फलाटांवरची गर्दीच इतकी होती की मुंबईच्या दिशेकडील रेल्वे पुलावर, जिन्यांवरही लोक गाडीची वाट पाहत तास-दीड तास उभे होते.
अनेक प्रवाशांनी रस्ते मार्गाने मुंबईच्या दिशेने यायचे ठरविले खरे परंतु, बसगाडय़ा कमी आणि अनेक बसथांब्यांवर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी गर्दीच गर्दी दिसून आली. ठाण्याहून थेट बसगाडय़ा न मिळाल्याने अनेक प्रवाशांनी मिळेल त्या मार्गाने मुंबईत येण्याचा मार्ग अवलंबला. अनेकांनी ठाणे पूर्वहून मुलुंडची बस पकडली, मुलुंडहून अर्धा-पाऊण तास वाट पाहून चेंबूर, दादरच्या दिशेने जाणारी मिळेल ती बस पकडली आणि मार्गक्रमण सुरू केले. परंतु पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व बसथांबे गर्दीने फुलून गेले होते. बसमधील तोबा गर्दी आणि घाटकोपर आगार, शीव आगार, कुर्ला पूर्व बसआगार ते थेट दादर खोदादाद सर्कलपर्यंत सर्वत्र गर्दीने भरलेल्या बसगाडय़ा धावत असल्याचे चित्र दिसून आले. अनेक लोकांना दक्षिण मुंबईत तसेच भायखळा, लोअर परळ, परळ येथील कार्यालयांमध्ये जाण्यासाठी अनेक बसगाडय़ा बदलून टप्प्याटप्प्याने प्रवास करावा लागला. त्यामुळे ठाण्यापासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंतच्या प्रवासाला तब्बल तीन ते साडेतीन लागले.