ठाण्याकडून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रान्सहार्बर रेल्वेमार्गावर बंद पडलेले मालगाडीचे इंजिन हटविण्यात यश आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता सुरू झाली आहे. मात्र, गाड्यांच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे ही वाहतूक उशीरानेच सुरू असून ती पूर्ववत होण्यास आणखी काही काळ जावा लागेल. ऐरोली स्थानकानजीक मंगळवारी साधारण दुपारी २.३० च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मालगाडीचे इंजिन अचानकपणे बंद पडले होते. त्यामुळे वाशीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. दरम्यान, वाशी आणि बेलापूरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतूकीवर या सगळ्या गोंधळाचा कोणताही परिणाम झालेला नाही. याठिकाणची रेल्वेसेवा व्यवस्थितपणे सुरू आहे.
गेल्याच महिन्यात दुरूस्तीचे काम सुरू असताना ठाणे आणि ऐरोली या स्थानकांदरम्यान, पारसिक बोगद्याजवळ दुरूस्ती वाहन अडकून पडल्यामुळे ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती.