विलास जोशी हे अत्यंक कुटुंबवत्सल होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घरी जाण्यापूर्वी त्यांनी पत्नीला फोन केला. जेवायला थांब मी थोडय़ा वेळाने घरी पोहोचेन एकत्र जेऊ असे त्यांनी पत्नीला सांगितले. हाच त्यांचा शेवटचा फोन ठरला. त्यांनतर ही दुर्देवी घटना घडली. जेव्हा त्यांना गोळी लागली तेव्हाही ते शांत होते. रुग्णालयातही शेवटपर्यंत बोलत होते. मृत्यूच्या दारात आलोय याची त्यांना कल्पना होती, पण तरी त्यांनी धीर सोडला नव्हता, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

सोनसाखळी चोरांचा कर्दनकाळ
दिलीप शिर्के त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मनमिळावू म्हणून परिचित होते. त्यांना अन्याय सहन होत नव्हता, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. सोनसाखळी चोरांचे कर्दनकाळ म्हणून शिर्के ओळखले जायचे असे त्यांच्या मित्राने सांगितले. वरिष्ठांचा निरोप समारंभ होतो. पण खालच्या कर्मचाऱ्यांचा का नाही, म्हणून शिर्के यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.

..दु:ख करायलाही वेळ नाही
शनिवारी रात्री वाकोला पोलीस ठाण्यात रक्तरंजित थरार घडला. सगळं काही अनपेक्षित घडलं होतं. पण रविवारचा दिवस नेहमीसारखा उजाडला. वाकोला हे व्यस्त पोलीस ठाणे आहे. रविवारीही नागरिक नियमितपणे तक्रारी घेऊन येत होते. पोलीस कर्मचारी अंत्ययात्रेला जाऊन आले आणि आपल्या कामाला लागले. आमची कालची रात्र धावपळीत गेली. आज पुन्हा दिवस सुरू झाला. दुख करायलाही आमच्याकडे वेळ नाही, याची खात्री पटली असे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप यादव यांनी सांगितले. कालच्या घटनेबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. जोशी यांच्या केबीनच्या बाहेर आता फक्त त्यांच्या नावाची पाटी उरली होती.

शिर्के यांचे पिस्तूल काढून घेतले होते..
शिर्के यांनी वरिष्ठांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यांचा स्वभाव रागीट होता. म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडील पिस्तूल काढून घेतले होते. परंतु मागील महिन्यात ते कॉम्बॅट व्हॅन वर तैनात होते. तेव्हा त्यांना हे पिस्तूल पुन्हा देण्यात आले होते. जर शिर्के यांच्याकडे पिस्तूल नसते तर कदाचित हा दुर्देवी प्रसंग घडला नसता.

ताण कमी करण्यासाठी पोलिसांकडूनच आलेल्या सूचना :
*पोलिसांची डय़ुटी १२ तासांवरून आठ तास करणे
*पोलीस नाईक, हेड कॉन्स्टेबल, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक या सर्वाना कामाचे समान वाटप
*हक्काची साप्ताहिक रजा रद्द न करणे
*दीर्घ मुदतीची रजा आगाऊ मंजूर करणे
*पोलिसांच्या विविध तक्रारींचे निरसन करण्यासाठी शासकीय व्यासपीठाची निर्मिती
* बार तपासण्याची पोलिसांवरील जबाबदारी काढून घ्यावी वा बारमध्ये ९.३० नंतर महिला वेटर्स ठेवण्याची परवानगी देऊ नये
* सायकल, मोबाइल, हरविलेल्या व्यक्तींचा तपास तसेच वॉरंट, समन्स, फरारी घोषित करणे आदी आणि अर्जावरून चौकशीची कामे हेड कॉन्स्टेबल किंवा पोलीस नाईक यांच्याकडे सोपवावीत
* प्रत्येक तपास अधिकाऱ्याला किमान एक लेखनिक द्यावा
* परिणामकारक बीट पद्धत
*शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम करण्याची व्यवस्था आणि काही ठरावीक कालावधी देण्यात यावा
*कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवावा
*अनावश्यक पोलीस बंदोबस्त टाळावा