पुण्यातील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) खजिन्यात नुकताच १६२ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यांपैकी १२५ पेक्षा जास्त चित्रपटांच्या मुळ आणि दुय्यम निगेटीव्ह उपलब्ध झाल्या आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या चित्रपटांमध्ये ४४ कृष्णधवल चित्रपट आहेत, तर प्रदर्शित होऊ न शकलेले १५ चित्रपटही यात समाविष्ट आहेत.

या संग्रहात बहुतांश हिंदी चित्रपटांचा समावेश असून, त्या व्यतिरिक्त ३४ गुजराती, १५ मराठी, ६ भोजपुरी आणि काही नेपाळी चित्रपटांचाही समावेश आहे. ‘महात्मा’च्या मुळ निगेटीव्हचा यात समावेश असून, विठ्ठलभाई झवेरी यांच्याकडून प्राप्त झालेले ६ तास लांबीचे महात्मा गांधींजींचे चित्रीकरणही उपलब्ध झाले आहेत. झवेरी हे गांधीजींचे सहकारी छायाचित्रकार आणि चित्रपट निर्मातेही होते.

संग्रहालयाकडे उपलब्ध नसलेल्या काही चित्रपटांच्या प्रतीही या खजिन्याच्या रुपात उपलब्ध झाल्या आहेत. यात ‘फासला’ (१९७६) आणि ‘अमर सिंग राठोड’ (१९५७) हे हिंदी चित्रपट, बी. एस. थापा यांचा माला सिन्हा अभिनीत आणि जयदेव यांनी संगीत दिलेला नेपाळी चित्रपट ‘मैती घर’ (१९६६) तसेच जयवंत पाठारे यांच्या ‘आलय तुफान दर्याला’ (१९७३) या मराठी चित्रपटाचा समावेश आहे.

या संग्रहातील इतर चित्रपटांमध्ये इजरा मीर यांच्या ‘सितारा’ (१९३९), मणी कौल यांच्या ‘उसकी रोटी’ (१९६९), के. ए. अब्बास यांच्या अमिताभ बच्चन अभिनीत ‘सात हिंदुस्तानी’ (१९६९), दिलीपकुमार अभिनीत ‘कोहिनुर’ (१९६०) , ‘कुँवारा बाप’ (१९७४), ‘पृथ्वीराज चौहान’ (१९५९), नर्गिस आणि राज कपूर अभिनीत ‘अंबर’ (१९५२) या हिंदी, ‘जीवी राबरन’ (१९८०) या गुजराती, ‘बन्या बापू’ (१९७७) या मराठी, तसेच ‘जिंदगी और तुफान’ या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. १९६४ साली टोकियो इथे झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिकचे चित्रीकरण असणाऱ्या कोन इचिकावा यांच्या ‘टोकियो ऑलिम्पियाड’ (१९६५) या चित्रपटाचाही या संग्रहात समावेश आहे.

हा संपूर्ण संग्रह मुंबईतील ‘फेमस सिने लॅबोरेटरी’ मधून प्राप्त झाल्याचे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी सांगितले. संग्रहालयातील बहुतांश चित्रपट मुळ आणि दुय्यम निगेटीव्ह स्वरुपात असल्यामुळे हा ठेवा अनमोल आहे. संग्रहालयात अशा प्रकारच्या चित्रपटांच्या प्रती संग्रहीत करुन चित्रपट उद्योगाने संग्रहालयावर विश्वास दाखवला आहे. देशातील चित्रपटांचा वारसा भावी पिढ्यांसाठी जपता यावा, यासाठी चित्रपट निर्मात्यांनी हा आदर्श बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.