मंत्रालय परिसरातील कार्यालये बॅलार्ड इस्टेटमध्ये

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पासाठी मंत्रालयाच्या समोरील कुटीरांमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप या पक्षांची कार्यालये पाच वर्षांसाठी मुंबई पोर्टच्या ठाकरसी हाऊस येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
फ्री प्रेस जर्नल मार्गावरील कुटीरांमध्ये पक्ष तसेच शासकीय कार्यालये मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र याच ठिकाणाहून मेट्रो-३ जात आहे. त्यामुळे ही कार्यालये तात्पुरती स्थलांतरित करण्याची विनंती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सरकारकडे केली होती. मात्र ही जागा सोयीची असल्याचा दावा करीत पक्षांनी या स्थलांतरास प्रारंभी तीव्र विरोध केला होता. त्यावर दक्षिण मुंबईतच पर्यायी जागेची ग्वाही मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिल्यानंतर हा विरोध मावळला आहे. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना,भारिप बहुजन महासंघ, शेकाप, आरपीआय(कवाडे गट) आरपीआय डेमोक्रेटिक आणि समाजवादी पार्टी या पक्षांचे बेलार्ड इस्टेट परिसरात पोर्ट ट्रस्टच्या ठाकरसी हाऊसमध्ये स्थलांतर होणार आहे. या पक्षांसाठी १८ हजार चौरस फूट जागा देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)चे स्थलांतर एनसीपीए परिसरातील अर्नेस्ट बिझनेस हाऊस येथे होणार आहे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे फोर्टमध्ये हुडको कार्यालयात तर रंगभूमी प्रयोग व परिनिरीक्षण मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (प्रकाशने विभाग) यांचे चर्चगेट यूबीआय बििल्डगमध्ये स्थलांतर होणार आहे. अशाच प्रकारे अन्य कार्यालयांचेही स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले असून पर्यायी जागेची सुविधा निर्माण करून देण्याची जबाबदारी एमएमआरडीए आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टाकण्यात आली आहे.