कर्जतजवळील शेलू येथील जी. व्ही. आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापक व कर्मचारी अशा सुमारे ३० जणांनी अनेक महिने वेतनच मिळत नसल्यामुळे कंटाळून सामूहिक राजीनामा दिला आहे. गेले सहा महिने या अध्यापकांना वेतन देण्यात आले नसून नियमानुसारही वेतन देण्यात येत नसल्यामुळे कंटाळून या अध्यापकांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्यामुळे शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांच्याही भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील अनेक अभियांत्रिकी महविद्यालयांमध्ये अध्यापक व कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यात येत नाही एवढेच नव्हे तर नियमानुसार वेतन आणि प्रवास तसेच अन्य भत्तेही देण्यात येत नाही. तथापि नोकरीची अवस्था बिकट असल्यामुळे बहुतेक महाविद्यालयांमधील अध्यापक तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करताना दिसतात. कर्जत येथील जी. व्ही. आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २५ अध्यापकांनी प्राचार्य जोग यांच्याकडे सामूहिक राजीनामाच सादर केला असून याबाबत प्राचार्य जोग तसेच संस्थाचालक मंजुनाथ यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. राज्यात सध्या ३६४ अभियांत्रिकी महाविद्यालये असून यामध्ये एक लाख ५७ हजार जागा आहेत. गेली दोन वर्षे यातील सुमारे ५० हजार जागा रिक्त राहत असून शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणापोटी मिळणाऱ्या अनुदानावर चालणारीही काही महाविद्यालये असल्याची चर्चा आहे. या महाविद्यालयांमघ्ये नेमके किती अध्यापक आहेत, त्यांना वेतन किती मिळते तसेच ते नियमित मिळते का, याबाबत तंत्रशिक्षण संचालनालय व फी शिक्षण शुल्क समितीने कधीही पाठपुरावा केलेला नाही. अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘सिटिझन फोरम’ या संस्थेने याबाबत सातत्याने आवाज उठवला असून जी. व्ही. आचार्य महाविद्यालयातील अध्यापकांच्या वेतनप्रश्नी तंत्रशिक्षण संचालक सु. का. महाजन यांच्याकडे विचारणा केली. या महाविद्यालयांतील अध्यापकांनाच वेतन तसेच अन्य बाबी गेले अनेक महिने मिळत नसल्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्याने येथील विद्यार्थ्यांचे काय होणार हा प्रश्नही निर्माण झाला आहे.