पत्नीने केलेल्या निराधार आरोपांचा आधार घेत घटस्फोटाची मागणी करणे एकाला चांगलेच महागात पडले. पत्नीने पतीला क्रूर वागणूक देऊन त्याचा मानसिक छळ केल्याची बाब कुटुंब न्यायालयाने मान्य केली असली तरी स्वत:च्या चुकांचा फायदा उठवणाऱ्या पतीचे वर्तन तसेच संसार मोडायचा नाही या पत्नीने केलेल्या मागणीतून न्यायालयाने पतीची घटस्फोटाची मागणी फेटाळण्याचा दुर्मीळ निर्णय दिला आहे.
२०१० मध्ये या दाम्पत्याचा विवाह झाला तसेच त्यांना एक मूल आहे; परंतु पत्नी क्रूर वागणूक देत असल्याचा आरोप करत लग्नबंधनातून मुक्त होण्यासाठी पतीने कुटुंब न्यायालयात धाव घेतली होती, तर आपल्याला संसार मोडायचा नाही, असे सांगत पत्नीने तिच्यावर लावलेले सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला होता. पत्नी किरकोळ गोष्टींवरून आपल्याशी व आपल्या कुटुंबीयांसोबत सतत वाद घालते. ती सतत फोनवर बोलते आणि रात्री-बेरात्री घराजवळील बागेत चालण्यासाठी जाते. ती स्वयंपाकही कधीच करत नाही. उलट अनेकदा गॅस सुरू ठेवून निघून गेली होती. तिच्या या कृतीमुळे घरातील लोकांसोबत आजूबाजूला राहणाऱ्यांचाही जीव धोक्यात आला होता. एवढेच नव्हे, तर गर्भधारणा झाल्यानंतर हे मूल तुझे नाही, असे ती सतत आपल्याला सांगत होती. त्याचा प्रचंड मानसिक मनस्ताप सहन करावा लागल्याचा दावा पतीने घटस्फोटाची मागणी करताना केला होता. दुसरीकडे पतीने केलेले आरोप बिनबुडाचे असून उलट तो आणि त्याचे कुटुंबीय हुंडय़ासाठी आपली छळणूक करत असल्याचा दावा पत्नीकडून करण्यात आला होता, परंतु तिचा हा दावा ती सिद्ध करू शकली नाही.
आरोप सिद्ध करण्यासाठी दोघांनी सादर केलेले पुरावे बारकाईने पडताळत पत्नीने पतीविरोधात निराधार आरोप केल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. तसेच निराधार आरोप करणे ही मानसिक क्रूरताच असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र स्वत:च्या चुकांचा पतीकडून फायदा उठवला गेला नाही ना? हे पाहण्याची जबाबदारी हिंदू विवाह कायद्याच्या कलम २३ नुसार न्यायालयावर सोपवण्यात आली आहे. वाईट आणि अयोग्य वर्तन वा वागणूक हे कायद्यानुसार गैरकृत्याच्या संकल्पनेत मोडते. त्यामुळेच याप्रकरणीही पतीच्या बाबतीत न्यायालयाने या तरतुदीचा आधार घेत पतीकडून चुकीचा फायदा उठवल्याचा ठपका ठेवला आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्याबाबत खूप गंभीर आरोप केलेले आहेत. त्याच्या संशयामुळे पत्नीला डीएनए चाचणीला सामोरे जावे लागले. मूल आपले नाही हे पत्नीकडून सतत सांगितले गेल्याने मुलाचा पिता कोण हे जाणून घेण्यासाठी ही चाचणी आवश्यक होती, असा दावा पतीकडून करण्यात आला. या प्रकरणी पत्नीप्रमाणे पतीनेही चुकीचे कृत्य केलेले आहे आणि पत्नीच्या निराधार आरोपाचा फायदा त्याला घेण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याची काडीमोडाची मागणी फेटाळून लावली.

पत्नीच्या निराधार आरोपाचा फायदा पतीला घेण्यास परवानगी नाही
संशयाचे भूत गंभीर असून महिलेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारे आहे. त्यामुळेच अशा पतीची घटस्फोटाची मागणी मान्य करणे म्हणजे चुकीच्या कृतीला खतपाणी घालण्यासारखे आहे. तेव्हा पत्नीवर चिखलफेक करताना आपल्यावर चिखलफेक केली जात असल्याची तक्रार तो करू शकत नाही. म्हणूनच पत्नीच्या निराधार आरोपाचा फायदा पतीला घेण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.