मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ३० सप्टेंबपर्यंत समितीस अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
द्रुतगती मार्गावर १९ जुलै रोजी दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्याबाबत विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान या दुर्घटनेस ठेकेदार आयआरबी कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सदस्यांनी केला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी केली होती. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी तज्ज्ञ समितीमार्फत चौकशीची घोषणा केली होती. त्यानुसार द्रुतगती मार्गावर परीक्षण आणि दुरुस्तीबाबत जबाबदारी असणाऱ्या विविध यंत्रणांची सखोल चौकशी करण्यासाठी तसेच विविध यंत्रणांसोबत राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेल्या करारनाम्यांची कायदेशीर व तांत्रिक तपासणी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती सुमन दत्ताराम पंडित आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव म. वा. पाटील यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती दरडी कोसळण्याची कारणमीमांसा करून पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, या घटनांना जबाबदार यंत्रणा आणि अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे काम समितीवर सोपविण्यात आले आहे. ३० सप्टेंबपर्यंत समितीस अहवाल सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.