हवेच्या वेगाने धावणाऱ्या रेसिंगच्या गाडय़ा आणि क्लासिक गाडय़ांचा अनोखा संगम मुंबईकरांना शुक्रवारी अनुभवता येणार आहे. भारतीय संग्राहकांकडे मालकी असलेल्या बारा शानदार क्लासिक रेसिंग गाडय़ांचे प्रदर्शन आणि जगातील सर्वात वेगवान कारचालक महिला म्हणून लौकिक असणाऱ्या मिशेल माऊटन यांच्याकडून मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील महिलांच्या योगदानाविषयी जाणून घेण्याची संधी ‘ओसियानामा विन्टेज अँड क्लासिक ऑटोमोबाइल्स क्लब’च्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मिळणार आहे.
‘ओसियानामा’च्या वतीने २७ मार्च, शुक्रवारी दुपारी लिबर्टी सिनेमा येथे ‘ओसियानामा विन्टेज अँड क्लासिक ऑटोमोबाइल्स क्लब’चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने जागतिक मोटर रेसिंगच्या प्रांगणात उडी घेणाऱ्या पहिल्या महिला मिशेल माऊटन मुंबईत आल्या असून त्या मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात आजवर महिलांनी दिलेले योगदान कसे होते, या विषयावर भाषण करणार आहेत. मिशेल यांनी सर्व प्रकारच्या मोटर रेसिंगमध्ये यश मिळवले आहे. १९८१ मध्ये ‘वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिप- द रॅली सानरेमो’ची फे री जिंकणाऱ्या त्या पहिल्या आणि आजवरच्या एक मेव महिला आहेत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. गाडी चालवणे हे आपल्या दृष्टीने स्वातंत्र्य मिळण्यासारखे आहे, असे सांगणाऱ्या मिशेल यांनी मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात तुम्ही पुरुष आहात की स्त्री हे महत्त्वाचे नाही, तर मनगटावरच्या घडय़ाळात दिसणारी वेळ आणि तुमचा वेग या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात, असे प्रतिपादन केले. ओसियानामा सोहळ्याच्या निमित्ताने मोटरस्पोर्ट्स क्षेत्राविषयी तरुण मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी त्या उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. मिशेल यांच्या भाषणाबरोबर बारा शानदार क्लासिक रेसिंग गाडय़ांच्या प्रदर्शनाबरोबरच ‘द आर्ट ऑफ मोटरस्पोर्ट्स : इंडिया, वुमेन, पॅट्रिमॉनी अँड क्लासिक अ‍ॅसेट्स’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने तीन वेळा एफ १ विजेता ठरलेल्या ब्राझीलच्या प्रख्यात आयट्रन सेना यांच्यावर आधारित ‘सेना’ हा लघुपटही या वेळी दाखवण्यात येणार आहे.