काही पदार्थ हे पोट भरण्यासाठी खायचे असतात, तर काही केवळ आनंदासाठी. ते खाण्यासाठी कुठलंही निमित्त चालतं. आइस्क्रीम हा असाच एक पदार्थ; पण जो पदार्थ आनंदासाठी खाल्ला जातो त्याबद्दल आपण जरा अति संवेदनशील असतो. विशिष्ट चव किंवा प्रकारामध्येच आपल्याला तो पदार्थ खायला आवडतो. त्यामुळे अशा पदार्थासोबत प्रयोग करताना खूप काळजी घ्यावी लागते. अशाच दोन प्रयोगशील तरुणांशी नुकतीच ओळख झाली. सन्मिश मराठे आणि पराग चाफेकर. ही जोडगोळी आइस्क्रीम तयार करते; पण त्यांचे फ्लेवर्स हे आजवरचे सर्वात हटके फ्लेवर्स आहेत. यांनी जगप्रसिद्ध अशा दोन मराठमोळ्या पदार्थाचं आइस्क्रीम तयार केलंय. पुरणपोळी आणि मोदक; पण गोष्ट इथेच न संपता खरं तर इथून पुढे सुरू होते. कारण या आइस्क्रीममध्ये केवळ त्या पदार्थाचे अर्क नाहीएत, तर पुरणपोळी आइस्क्रीममध्ये पुरण आणि मोदक आइस्क्रीममध्ये सारण घातलेलं तुम्हाला दिसेल. तुमचा विश्वास बसणार नाही, पण या दोन्ही फ्लेवर्सची चव कल्पनेपलीकडील आहे. कारण त्यामध्ये तुम्हाला तो पदार्थ आणि आइस्क्रीम अशा दोन्ही गोष्टी एकत्रितपणे चाखल्याचा आनंद मिळतो.

सन्मिशने हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर तीन-चार वर्षे क्रूझवर आणि परदेशात काम केलं; पण स्वत:चं वेगळं काही तरी सुरू करण्याची तीव्र इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्याने दोन वर्षांपूर्वी आइस्क्रीम बनवायचा निर्णय घेतला. साधारण वर्षभर प्रयोग केल्यानंतर पराग चाफेकर हा त्याचा मित्र त्याच्या साथीला आला. सिव्हिल इंजिनीअर असलेल्या परागने मीडियामध्ये बरीच वर्षे काम केलं आहे. त्यानंतर तो बिझनेस कन्सल्टन्सीमध्येही होता. सन्मिश आणि परागने हातमिळवणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने ‘द आइस्टसी प्रोजेक्ट्स’द्वारे आइस्क्रीममधील प्रयोगांना सुरुवात झाली.

आइस्क्रीम खाताना दोन पर्याय प्रामुख्याने समोर येतात. पहिला म्हणजे बटरस्कॉचसारखे परदेशी फ्लेवर्स आणि दुसरा म्हणजे ताज्या फळांचे आइस्क्रीम; पण सन्मिश आणि पराग हे थोडा चौकटीबाहेरचा विचार करणारे. त्यांच्या मते, ज्या फ्लेवर्सचा शोध आपल्याकडे लागलाच नाही ते बनवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या चवीच्या तुलनेत आपले फ्लेवर्स दुय्यमच ठरतील. त्याचप्रमाणे जे पदार्थ आपले आहेत, त्यांचे फ्लेवर्स आपल्यापेक्षा अधिक चांगलं कोणीच बनवू शकत नाही, कारण त्यामागचं शास्त्र आणि भावना आपणच अधिक योग्य प्रकारे जाणू शकतो. यामधूनच सुरुवात झालेल्या प्रयोगांतून आजवर तब्बल पन्नास वेगवेगळे फ्लेवर्स त्यांनी तयार केले आहेत आणि तरीही अजून दीडशे फ्लेवर्सची यादी त्यांच्याकडे तयार आहे.

ज्या आइस्क्रीममध्ये फॅट कंटेन्ट जास्त आणि हवा कमी ते आइस्क्रीम चवीला चांगलं लागतं. त्यामुळे यांनी सर्वप्रथम मूलभूत आइस्क्रीमवर काम केलं. त्यासाठी बाजारातील सर्व देशी आणि परदेशी आइस्क्रीमचा बारकाईने अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी मिलिंद साळवी या डेअरी सल्लागाराचं मार्गदर्शन घेतलं. आइस्क्रीमला सर्वात क्रीमी आणि स्मूथ बनवण्यात साळवी यांचा मोठा हातभार आहे.

आंबा, फणस, सीताफळ, पेरू, चिकू, जांभूळ आणि रातंबा या फळांचे आइस्क्रीम येथे कुठलाही रंग किंवा अर्क न टाकता तयार केली जातात. तसंच त्यामध्ये चांगल्या प्रतीची फळंच वापरली जातात. मग त्या आइस्क्रीमची किंमत वाढली तरी चालेल. कारण कच्चा माल जितक्या चांगल्या प्रतीचा तितकं तुमचं फायनल प्रॉडक्ट चांगलं तयार होतं, असं पराग यांचं म्हणणं आहे. आंब्याचं आइस्क्रीम बनवतानाही थेट आंब्याचं आइस्क्रीम न बनवता आंबावडीचं आइस्क्रीम बनवण्याचं धाडस त्यांनी केलं आहे. फळांच्या आइस्क्रीमपाठोपाठ चहा, गुलकंद, पान, अद्रक, पॉपकॉर्न, मोतीचूर लाडू आइस्क्रीमही यशस्वीरीत्या तयार करण्यात यश आलंय. च्यवनप्राश आणि काळ्या अरेबियन खजुराचं आइस्क्रीमही यांच्या फॅक्टरीमध्ये तयार झालंय. चीज आइस्क्रीम तर इतकं स्मूथ आहे की, तुम्ही ते खाल्ल्यावर इतकं कोणताही फ्लेवर मागणार नाही.

प्रत्येक नवीन फ्लेवर तयार करताना सन्मिश आणि पराग हे टप्प्याटप्प्याने काम करतात. सर्वात आधी त्याचा वेब रीसर्च होतो. त्यानंतर त्या पदार्थाविषयी माहिती असणाऱ्या लोकांसोबत चर्चा केली जातो. कुठलाही भारतीय गोड पदार्थ आम्ही ‘डिकन्स्ट्रक्ट’ करतो. त्याची रेसिपी समजून घेतो. तो पदार्थ खाताना त्याची मुख्य चव कुठली असते, त्याची लज्जत कशी वाढेल याच्या चाचण्या केल्या जातात आणि मग त्याचा फ्लेवर बनवायला घेतो, असं सन्मिश सांगतो. हे सारं करतानाही आइस्क्रीम खातोय याची मजा खाणाऱ्याला यायला हवी, हे तत्त्व पाळलं जातं.

‘द आइस्टसी प्रोजेक्ट्स’चे सध्या कुठेही दुकान नाही. सध्या विलेपार्ले आणि अंधेरी परिसरात स्विगीवर ऑनलाइन ऑर्डर करून तुम्ही हे आइस्क्रीम मागवू शकता. मुंबईतील इतर भागांतील लोकांनाही खाली दिलेल्या फोनवर किंवा ई-मेलवर ऑर्डर देता येऊ  शकते. भविष्यातही ‘क्लाऊड किचन’ हीच संकल्पना ठेवून ऑनलाइनच राहण्याचा त्यांचा मानस आहे. दुकानाच्या भाडय़ात पैसे गुंतवण्यापेक्षा त्यांना तीच गुंतवणूक लॅबमध्ये करायची आहे, जेणेकरून त्यांना अधिकाधिक फ्लेवर्सवर काम करता येईल आणि जास्तीत जास्त भारतीय पदार्थाचे फ्लेवर्स आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डच्या आणि फ्लेवर्सच्या तोडीचे बनवता येतील.

द आइस्टसी प्रोजेक्ट्स

  • आइस्क्रीम ऑर्डर करण्यासाठी ९०२९०००११३ या क्रमांकावर अथवा icestasyprojects@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता.

@nprashant

nanawareprashant@gmail.com