‘लोकसत्ता’ आयोजित ‘मार्ग यशाचा’मध्ये सलग दुसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद
करिअरची योग्य वाट चोखाळण्यासाठी सज्ज झालेल्या दहावी-बारावीच्या आणि पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्ग दाखविण्यासाठी ‘मार्ग यशाचा’ या ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेचा शुक्रवारीदेखील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यशाळेचे उद्घाटन पहिल्या दिवशी मुंबईच्या (शहर) जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून करिअरकडे लक्ष दिल्यास अपयश पचवूनही यश मिळवता येते, असा मौलिक सल्ला दिला होता. यामुळे भारावून गेलेले विद्यार्थी कार्यशाळेच्या सलग दुसऱ्या दिवशीही मोठय़ा संख्येने रवींद्र नाटय़ मंदिर येथे उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील तज्ज्ञ समुपदेशकांनी पुन्हा एकदा यशाचा मूलमंत्र दिला.
‘मार्ग यशाचा’ कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करत त्यांना विविध अभ्यासक्रमाची माहिती, त्यांच्या प्रवेश परीक्षा, ते पूर्ण करताना झेलावी लागणारी आव्हाने, त्यातील उच्चशिक्षणाच्या संधी अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था’ (आयव्हीजीएस) या राज्य सरकारच्या जुन्या व नामांकित संस्थेच्या अनुभवी व तज्ज्ञ समुपदेशकांनी
या कार्यशाळेद्वारे विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन
केले.
अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीने प्रेझेंट केलेल्या व विद्यालंकार क्लासेसच्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय युक्ती तसेच पॉवर्ड बाय गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन, अरेना अ‍ॅनिमेशन एन.ए.एम.एस. शिप मॅनेजमेंट प्रा. लि. आणि सास्मिरा आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे ‘नॉलेज पार्टनर’ ‘आयटीएम’ हे आहेत.

निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. या क्षमतेबरोबरीने त्यांच्या पुढे आलेल्या गोष्टी या योग्यरीतीने समजून घेणे आवश्यक आहे.
– दीपाली दिवेकर, समुपदेशक

वाणिज्य शाखेत आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठय़ा संधी उपलब्ध असून केवळ सीए व कंपनी सेक्रेटरी या संधींकडेच न पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या पर्यायांचाही विचार करावा.
– सुरेश जंगले, समुपदेशक

विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगळ्या वाटा उपलब्ध असून अभियांत्रिकीतील पदविका, पदवी या पलीकडेही अनेक संधी असून विद्यार्थ्यांनी आपले लक्ष तेथे केंद्रित करावे.
– विवेक वेलणकर, समुपदेशक

स्पर्धा परीक्षांना घाबरून जाऊ नका, तुम्हाला संपूर्ण दोन वर्षांचा कालावधी आहे. रोज किमान पाच तास अभ्यासाने तुमच्यावर येणारा परीक्षेचा ताण कमी करता येऊ शकतो. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या क्षेत्रांतील परीक्षा कठीण वाटत जरी असल्या तरी त्यात यशस्वी होणं शक्य आहे. गणिताचा वेगळ्या अंगाने विचार करण्याची आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. मी स्वत: गणिताचा शिक्षक असल्याने मुलांना येणारे अडथळे माहिती आहेत, त्यावर मात करा यश तुमचेच आहे.
– हितेश मोघे, विद्यालंकार क्लासेस

कला क्षेत्रात सध्या अनेक नव्या संधी निर्माण झाल्या असून गुण कमी मिळाले म्हणून या शाखेत प्रवेश न घेता विद्यार्थ्यांनी आपल्यातील अंगभूत गुण ओळखून त्यांची सांगड कला क्षेत्राशी घालावी. या शाखेतील भाषांतरकार, विधिज्ञ, पत्रकार, जाहिरातकार आदी क्षेत्रांकरिता कोणकोणते वैशिष्टय़पूर्ण गुण विद्यार्थ्यांनी अंगी बाणवावे याची विस्तृत माहिती त्यांनी करून दिली.
– नीता खोत, समुपदेशक

ललित कला या काहीशा दुर्लक्षित असलेल्या शाखेत सर्टिफिकेट कोर्सेसपासून ते पदव्युत्तर स्तरावर अभ्यासक्रम उपलब्ध असून टॅटय़ू, टेबल फोटोग्राफी अशा नानाविध अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
– जयवंत कुलकर्णी, समुपदेशक

तुम्ही कोणत्या शहरातून आला आहात याचा आणि करिअरचा संबंध सहसा नसतो. दहावी-बारावीनंतर करिअरच्या अमाप वाटा हजर असल्यामुळे नेमकी निवड कोणाची करायची याबाबत कमालीची साशंकता असते. यातून विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. मात्र वर्कबुक कल्चरच्या आजच्या जमान्यात करिअरच्या वाटेवर शिक्षक सध्या कुठेच दिसत नाही. विद्यार्थी शिक्षकाच्या दोन पावलं पुढे नाही गेला तर ते त्या शिक्षकाचंच अपयश मानलं जातं. तसेच शिक्षण आणि वाचन यांचे अतूट नाते असून विद्यार्थ्यांनी खूप वाचन केले पाहिजे.
– डॉ. अभिजित शिरोडकर, संचालक- अ‍ॅमिटी स्कूल ऑफ आíकटेक्चर अ‍ॅण्ड प्लॅिनग, मुंबई.

विद्यार्थी प्रतिक्रिया
खरंच खूप छान उपक्रम ‘लोकसत्ता’ राबवत आहे. या कार्यक्रमात अश्विनी जोशींचे अनुभव, त्यांच्या करिअरचा प्रवास ऐकून फार छान वाटलं. डॉ. अभिजित शिरोडकर यांचा अ‍ॅटिटय़ूड आणि त्यांचं मार्गदर्शनही जास्त जवळचं वाटलं.
– भूषण, झूओलॉजीचा विद्यार्थी

विज्ञान या विषयातच मुळात मला आवड आहे. न्यूरो साइन्टिस्ट बनण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी काही प्रमाणात लोकसत्ताच्या या कार्यक्रमातून बरंच जाणता आलं.
– वृषाली गवारे, बारावीची विद्यार्थिनी

बारावीनंतर सीए आणि सीएस या अभ्यासक्रमाबाबत मिळालेली माहिती मला खूप मार्गदर्शनपर आहे. दोन्ही कोस्रेसबद्दल फायदे-तोटे कळाल्याने मला आता पुढील वाटचालीसाठी खूप उपयोग होईल.
– अक्षय शिंदे, भवन्स महाविद्याल

माझा कल हा पहिल्यापासूनच एमपीएससीच्या परीक्षेकडे असल्याने मला नेमकी कोणती शाखा निवडावी याबाबत संभ्रम होता. मात्र या कार्यक्रमामुळे मला त्याबाबत व्याख्यात्यांकडून मार्गदर्शन मिळाले.
– तुषार कदम, एस.पी.व्ही. महाविद्यालय

लोकसत्ताचा हा उपक्रम खरंच खूप फायदेशीर ठरला असे वाटते. कलचाचणीमुळे सुद्धा मी थोडा संभ्रमात होतो, मात्र आता स्वत:च्या आवडीच्या विषयात करिअर करायची संधी मिळेल याचा आत्मविश्वास वाटला.
– आदेश वानखेडे, विद्यार्थी.