जन्म प्रमाणपत्रावर बाळाचे नाव समाविष्ट करण्याचे राहून जाते आणि भविष्यात त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्या जन्म प्रमाणपत्रावर आपले नाव समाविष्ट करण्याची संधी पालिकेने उपलब्ध केली आहे. मात्र जन्म प्रमाणपत्रावर १४ मे २०२० पर्यंत नाव नोंदणी करावी लागणार असून त्यानंतर ही सुविधा उपलब्ध होणार नाही.
कायद्यातील तरतुदींनुसार जन्म नोंदणी दिनांकापासून १५ वर्षांपर्यंत बाळाच्या नावाची नोंदणी जन्म प्रमाणपत्रावर करता येते. परंतु अनेक जण बाळाचे जन्म प्रमाणपत्रही घेत नाहीत. रुग्णालयातून पाठविण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे पालिकेमध्ये जन्म नोंदणी करण्यात येते. त्यावर केवळ मुलगा अथवा मुलगी अशी नोंद होते. बाळाचे नाव समजू न शकल्यामुळे त्याची नोंद जन्म प्रमाणपत्रावर केली जात नाही. जन्म प्रमाणपत्रावर नाव नसल्यामुळे संबंधिताला पारपत्र, व्हीसा, उच्च शिक्षणाचा दाखल, नोकरी इत्यादी बाबत संबंधितांना समस्यांचा सामना करावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे जन्म प्रमाणपत्रावर नाव नोंदविण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु जन्म प्रमाणपत्रावर नाव नसलेल्यांना १४ मे २०२० पर्यंत त्याची नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर मात्र ही संधी मिळणार नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.