भारतीय वंशाचे संगणक वैज्ञानिक श्री के. नायर यांनी कोलंबिया विद्यापीठातील संशोधन संस्थेत स्वयंचलित व्हिडीओ कॅमेऱ्याचा शोध लावला आहे. हा कॅमेरा स्वयंचलित असून तो वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाह्य़ विजेची गरज लागत नाही. अंतर्गत व्यवस्थेमध्ये देण्यात आलेल्या प्रणालीमधूनच ऊर्जानिर्मिती होऊन कॅमेरा काम करतो.
सध्या आपण डिजिटल छायाचित्रण क्रांतीच्या मध्य युगात आहोत. स्वयंसिद्ध कॅमेरा विकसित करण्याचे आमचे ध्येय होते. कॅमेऱ्यामधून छायाचित्र काढणे हे जसे स्वयंचलित प्रणालीद्वारे होऊ शकते तशीच कॅमेरा वापरण्यासाठीची ऊर्जाही अंतर्गत प्रणालीद्वारे निर्माण होणे गरजेचे होते, असे मत नायर यांनी व्यक्त केले. नायर हे कोलंबिया विद्यापीठाच्या संगणक विभागातील प्रयोगशाळेचे प्रमुख आहेत. या कॅमेऱ्यामध्ये इमेज सेंसर वापरण्यात आला आहे. तसेच पिक्सेल्सची चीपही वापरण्यात आली आहे. यातील पिक्सेल हे फोटोडिओडचे असल्यामुळे ज्या वेळेस उजेड पडतो तेव्हा त्यात विद्युतप्रवाह निर्माण होतो. यामध्ये जे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये पडणाऱ्या उजेडाची घनता मोजण्याचीही क्षमता आहे. या प्रकल्पाचे ह्य़ुस्टन येथील राइस विद्यापीठात २४ ते २६ एप्रिलदरम्यान प्रथम सादरीकरण करण्यात येणार आहे.