मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी शिवसेना-भाजपची युती तुटली, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी युती तुटेल, असे युतीतीलच एका नेत्याने आपल्याला सांगितल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर यांनी भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले.
सुनील तटकरे यांनी गुरुवारी दुपारी ‘फेसबुक’च्या माध्यमातून ‘चॅट’ करीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांपैकी मोजक्या प्रश्नांना त्यांनी संक्षिप्त स्वरुपात उत्तरे दिली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून त्याची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेससोबत आघाडी का करीत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सध्या पक्षबांधणी करण्यात येईल आणि निवडणुका आल्यावर त्यासंदर्भात निर्णय घेऊ, असे सांगितले. मुंबईतील पक्षाचा प्रसार करण्यासाठी संघटनेची पुनर्रचना करण्यात येणार असून, कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व स्तरावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. आपण सरकारसोबत आहोत की सरकारजमा झालो आहोत, याचे उत्तर आधी उद्धव ठाकरे यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. पुण्यामध्ये पक्षाचा शहराध्यक्ष कोण असेल, याचे नेमके उत्तर देणे त्यांनी टाळले. शहराध्यक्ष लवकरच जाहीर करण्यात येईल, एवढेच माफक उत्तर त्यांनी दिले. त्याचबरोबर पक्षाची सदस्य नोंदणी किती झाली आहे, यावरही त्यांनी त्रोटक उत्तर दिले. सदस्य नोंदणी ठिक झाली आहे. पुढे सतत ही प्रक्रिया सुरू राहिल, एवढेच त्यांनी सांगितले.