रिपब्लिकन पक्षाने साथ सोडली, तर शिवसेना-भाजप युतीला राज्यात सत्ता मिळणार नाही, असे मत रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीवरील ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेना, भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
महायुतीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये प्रस्तावांची देवाणघेवाण सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्ष महायुतीतील इतर चार घटक पक्षांना १० ते १४ जागा सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम संघटना काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना, भाजपला मिळालेल्या यशामध्ये रिपब्लिकन पक्षाचाही वाटा होता. आमच्या पाठिंब्यामुळेच या दोन्ही पक्षांचे इतके खासदार निवडून आले आहेत. आता विधानसभा निवडणुकीत आम्ही साथ सोडली तर शिवसेना-भाजप युतीला राज्यात सत्ता मिळणार नाही.