महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता या प्रकरणांमध्ये राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याभोवतीच्या अडचणी वाढू लागल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत राजकीय सूडभावनेने ही कारवाई केली जात असल्याची शंका आपल्याला येत आहे, असा आरोप सत्ताधारी भाजपवर केला.
ते म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतरही अनेक सरकारे मी पाहिलेली आहेत. पण अशा पद्धतीने सत्तेचा वापर करण्याची पद्धत मी कधीही पाहिली नव्हती. जे लोक भुजबळांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करत आहेत. ते राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. संसदेचे सभासद आहेत. त्यांच्या माध्यमातून या प्रकरणात चौकशी करणाऱ्या शासकीय यंत्रणांवर दबाव टाकण्यात येतो आहे. आरोप करणारे लोक पुढील कारवाईबद्दल आधीच माहिती जाहीर करत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘ईडी’कडून समीर भुजबळांना अटक
भुजबळ यांनी मंत्रिपदावर असताना घेतलेल्या निर्णयांना तत्कालिन मंत्रिगटाने मंजुरी दिली होती. मंत्रिगटाला घटनात्मक अधिकार असताना, त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर आरोप करून कारवाई कशी काय केली जाऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ज्यांची चौकशी सुरू आहे. त्या सर्वांनी चौकशी करणाऱ्या यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करून शरद पवार म्हणाले, आपली बाजू स्वच्छ असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. जे आरोप होत आहेत, त्याची सखोल चौकशी होऊ देत. त्याला पूर्ण सहकार्य करा.
छगन भुजबळांचे काय होणार?
भुजबळांच्या प्रकणात पहिल्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आणि नंतर दोन वेळा सक्तवसुली संचालनालयाकडून छापे टाकण्यात आले. एखाद्या प्रकरणात चौकशी करणाऱ्या यंत्रणांकडून एकदा छापा टाकणे समजू शकतो. पण एकाच प्रश्नासाठी तीन तीन वेळा छापे कसे काय टाकण्यात येतात, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.