कळंबोली सर्कलच्या उड्डाण पुलाखाली त्या विखुरलेल्या परिवारांची वस्ती आहे. कोण खेळणी विकतो, तर कोणी मातीच्या मूर्त्यां बनवतो. असेच अनेक परिवार येथे उड्डाण पुलाच्या आसऱ्याखाली राहतात. कळंबोली वाहतूक पोलिसांनी त्यांच्यासोबत शनिवारी भाऊबीज व दिवाळी साजरी केली. त्यावेळी तेथील अनेक महिलांना त्या पोलिसांमध्ये दादा सापडल्याची भावना होती. अशीच अवस्था खांदा कॉलनीमधील बालग्राम आश्रमातील मुलींची झाली.
सायन-पनवेल मार्गावरील कळंबोली सर्कल हा वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. नुकत्याच झालेल्या १० पदरी काँक्रीटकरणामुळे आणि सिग्नल यंत्रणेमुळे येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाली. रोज वाहतूक नियमनाचे काम करताना येथील पोलिसांच्या डोळ्यांसमोरून जशी वाहने धावतात तसेच या उड्डाण पुलाखालची दारिद्रय़ अवस्थेमध्ये जगणाऱ्या परिवारांचे दाहक चित्र हेच पोलीस उघडय़ा डोळ्यांनी पाहतात. प्रत्येक पोलिसाला या परिवारांसाठी काहीतरी करावेसे वाटते.
या हेतूने कळंबोली वाहतूक विभागाने यंदाचा दिवाळसण याच परिवारांसोबत साजरा करण्याचा विचार केला. हे परिवार लातूर, यवतमाळ येथून मोलमजुरीसाठी येथे आले आहेत. १० परिवारांमध्ये २० महिला आहेत. भाऊबीजेचा मुहूर्त साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर व त्यांच्या पथकाने येथील परिवारांना दिवाळी फराळाचे वाटप केले. त्यावेळी येथील चंद्रभागा सारख्या अनेक महिला या पोलीसदादामध्ये आपला गावचा भाऊ शोधत होत्या.
कळंबोली वाहतूक पोलिसांनी खांदा कॉलनी येथील बालग्राम आश्रमाला भेट दिली. या आश्रमात अनाथ मुले राहतात. काही मुली नोकरी करून येथील वसतिगृहात राहतात. या मुलामुलींना भाऊबीजेचा आनंद पोलिसांमुळे घेता आला.
गिरीधर या आश्रमातील मुलामुलींना म्हणाले, मी पोलीस नाही, आज तुमचा मामा म्हणून आलोय.  मात्र पोलीस आश्रमात शिरताच येथील मुलींनी तुम्ही आमचे मामा नाही, आमचे भाऊ असे संबोधून त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. अनेक वर्षांपासून या मुलींचे ओवाळणीचे ताट भावाच्या प्रतीक्षेत होते.
सुटीअभावी स्वत:च्या बहिणीपासून दुरावलेले पोलीस आणि आयुष्यात कोणीच नाही म्हणून भावाच्या शोधात असलेल्या डोळ्यांची आज प्रतीक्षा संपली होती. बालग्राममध्ये पहिल्यांदाच बहीण-भावाच्या नात्यांची घट्ट नाळ जुळलेली येथे पाहायला मिळाली. हा अनुभव कथन करताना पोलीस अधिकारी गिरीधर यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते.