गाडीतून प्रवास करणाऱ्या एका तरुणीकडील भ्रमणध्वनी आणि पर्स चोरण्यासाठी चोरटय़ांनी बाहेरून तिच्या हातावर फटका मारल्याने ती तोल जाऊन खाली पडल्याची संतापजनक घटना पश्चिम रेल्वेवर नुकतीच घडली. सुदैवाने तरुणीला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. तनुजा यादव (२३) असे या तरुणीचे नाव आहे.
तनुजाने गोरेगावला आपल्या घरी जाण्यासाठी बोरिवली रेल्वेस्थानकात चर्चगेटला जाणारी गाडी पकडली. तिने घरी दूरध्वनी करून गोरेगावला उतरत असल्याचे सांगितले आणि उतरण्यासाठी दरवाजाजवळ आली. त्यावेळी  बाहेरून चोरटय़ांनी तिच्या हातावर फटका मारला यात तनुजाचा तोल जाऊन ती खाली पडली. खाली पडल्यानंतर रेल्वेमार्गात उभ्या असलेल्या चोरटय़ांनी तिला मारहाण करून तिच्याकडील पर्स घेऊन पळ काढला.
तनुजाने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर तेथून जाणाऱ्या आशुतोष उपाध्याय या प्रवाशाने तिला मदत केली. अन्य काही प्रवाशांच्या मदतीने तिला गोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तनुजावर उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आल़े